रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून क्रू मेंबरचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?
रजनीकांत यांच्या 'जेलर 2' चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये एका क्रू मेंबरचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rajinikanth Jailer 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित Jailer 2 या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या एका क्रू मेंबरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका खासगी स्टुडिओमध्ये ‘जेलर 2’चे शूटिंग सुरू होते. यावेळी आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कार्तिकेयन नावाचे कर्मचारी घरासारखा सेट तयार करण्याचे काम करत होते. सेट उभारणीदरम्यान अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार करंट बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून चौकशी सुरु
स्थानिक कनाथुर पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सेटवर नेमका विजेचा लीक कसा झाला आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास केला जात आहे. अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली नसली तरी पोलिस विविध तांत्रिक बाबींची चौकशी करत आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट Jailer या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
चित्रपट रिलीज होण्याआधीच दुर्दैवी घटना
‘जेलर 2’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा ‘टायगर’ मुथुवेल पांडियन या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री राम्या कृष्णन त्यांच्या पत्नी विजया यांच्या भूमिकेत पुनरागमन करणार आहेत. तसेच शिव राजकुमार आणि मोहनलाल यांचे विशेष कॅमिओदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय मिथुन चक्रवर्ती हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर आणि संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे. अद्याप ‘जेलर 2’च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.