
‘स्पिट्सविला 16’ हा डेटिंग रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच तुफान चर्चेत आहे. या शोमध्ये बऱ्याच तरुण आणि तरुणी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. परंतु नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये प्रेम, रोमान्स आणि केमिस्ट्रीदरम्यान दोन मुलींमध्ये जबरदस्त कॅटफाइट पहायला मिळाली. ही कॅटफाइल इतकी वाढली की थेट दोघी हाणामारी करू लागल्या आणि हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ‘स्प्लिट्सविला 16’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सौंदर्या आणि सुझैन यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं. एकमेकींवर ओरडत या दोघींनी इतका राग व्यक्त केला की सुझैनने रागाच्या भरात थेट सौंदर्याच्या चेहऱ्यावर चहा फेकला. यानंतर सौंदर्याचाही संताप अनावर झाला.
सौंदर्या धावत गेली आणि ती सुझैनशी हाणामारी करू लागली. यानंतर सुझैनसुद्धा मागे हटली नाही. दोघींनी एकमेकींना जमिनीवर लोळवून हाणामारी केली, एकमेकांचे केसदेखील ओढले. शोमध्ये कॅमेरासमोर या दोघींना अशा पद्धतीने भांडताना पाहून अखेर इतर मुलांनी त्यांना सावरण्याचा आणि त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांत सौंदर्याच्या चेहऱ्यावर सुझैनने चहा फेकण्याची गोष्ट या शोचे सूत्रसंचालक सनी लिओनी आणि करण कुंद्रा यांना अजिबात आवडली नाही. यावेळी करण कुंद्राने सुझैनला खूप फटकारलं. तरीसुद्धा ती त्याच्यासमोर हसतच राहिली. हे पाहून सनी लिओनीच्या तळपायाची आग मस्तकात केली. सुझैनवर ओरडत सनी म्हणाली, “ही काही हसण्याची गोष्ट नाही. तू जे केलंस ते लज्जास्पद आहे, त्यामुळे हसणं बंद कर.”
करण कुंद्रा पुढे म्हणाला, “जर चहा गरम असता तर सौंदर्याचं करिअर, चेहरा आणि भविष्य सर्वच धोक्यात आलं असतं. मी मुलांसोबत काही चुकीचं होऊ देत नाही, तर मग मी मुलींसोबत कसं चुकीचं होऊ देऊ?” करण आणि सनी लिओनीने फटकारल्यानंतर सेटवर एकच शांतता पसरते. नंतर सुझैन सौंदर्याची माफी मागते.
‘स्प्लिट्सविला 16’च्या या सिझनला दोन भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. एक पैशांचा विला, जिथे फक्त पैशांची पॉवर चालते आणि प्रेमाचा विला.. जिथे फक्त प्रेम आणि कनेक्शनच स्पर्धकाला खेळात पुढे नेऊ शकतील. प्रेमाच्या विलाचे होस्ट करण कुंद्रा आणि सनी लिओनी आहेत, तर पैशांच्या विलाचे होस्ट निया शर्मा आणि उर्फी जावेद आहेत.