BBL 2026: पर्थ स्कॉर्चर्सने जेतेपदावर नाव कोरलं, मुंबई इंडियन्स-सीएसकेचा विक्रम मोडला
BBL 2026 Final: बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पर्थ स्कॉर्चर्सने सिडनी सिक्सर्सचा पराभव केला. तसेच जेतेपदावर सहाव्यांदा नाव कोरलं. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. अंतिम फेरीत काय झालं ते जाणून घ्या...

बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेचा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला थरार अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स हे संघ आमनेसामने आले होते. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने सिडनी सिक्सर्सला 6 गडी राखून पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सच्या वाटेला नाणेफेकीचा कौल गेला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण सिडनी सिक्सर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात फक्त 132 धावा केल्या. तसेच विजयासाठी 133 धावांचं आव्हान दिलं. खरं तर सिडनी सिक्सर्सचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले आणि धडाधड विकेट पडत गेल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. पर्थ स्कॉर्चर्सच्या भेदक गोलंदाजीपुढे कोणाचं काही एक चाललं नाही. कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा आकडा गाठता आला नाही. स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने 24 धावा केल्या. तर जोश फिलिप आणि मोइसेस हेनरिक्सने 24-24 धावा केल्या.
पर्थ स्कॉर्चर्सच्या गोलंदाजांनी सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजांना डोकं वर काढून दिलं नाही. युवा वेगवान गोलंदाज महली बियर्डमॅनने 2 विकेट घेतल्या आणि 29 धावा दिल्या. तर झाय रिचर्डसन आणि डेविड पायने यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. विजयासाठी मिळालेल्या 133 धावांचा पाठलाग करताना पर्थ स्कॉर्चर्सने फक्त 4 विकेट गमावल्या आणि 17.3 षटकात दिलेलं आव्हान गाठलं. या दरम्यान मिचेल मार्शने 44 धावांची खेळी केली. तर फिन एलनने 36 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. त्यामुळे विजय सोपा झाला. तर जोश इंग्लिसने नाबाद 29 धावा करत संघाला विजयाची चव चाखून दिली.
THE PRIDE OF PERTH 🧡
For a record sixth time, the Perth Scorchers are BBL champions 🏆 #BBL15 pic.twitter.com/ncqChsq9Ay
— KFC Big Bash League (@BBL) January 25, 2026
पर्थ स्कॉर्चर्सचा कर्णधार एश्टन टर्नरने सांगितलं की, ‘गेल्या 10 महिन्यांपासून, या स्पर्धेसाठी आपण सर्वोत्तम तयारी कशी करू शकतो याबद्दल फोनवर वेळ घालवणे, ईमेल, संभाषणे – खूप नियोजन केले जात आहे. गेल्या आठवड्यात त्या योजना प्रत्यक्षात आणणे थकवणारे पण अविश्वसनीयपणे रोमांचक आहे. ट्रॉफीने हे सर्व पूर्ण करणे अत्यंत समाधानकारक आहे. मी गेल्या 24 तासांत बरेच काही सांगितले आहे – सिक्सर्स एक मोठे आव्हान होते हे आश्चर्यकारक नव्हते. एक क्लब आणि एक संघ म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.’
पर्थ स्कॉर्चर्सने या विजयासह ऐतिहासिक नोंद केली आहे. आतापर्यंत बिग बॅश लीग स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्सने सहाव्यांदा विजय मिळवला आहे. यासह टी20 लीग स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवणारा संघ ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि सीपीएलमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स या संघाना मागे टाकलं आहे. या संघांनी प्रत्येकी पाच वेळा जेतेपद मिळवलं आहे.
