
अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं. प्रियाच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रिया ही सुबोधची चुलत बहीण होती. ‘माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली,’ अशा शब्दांत सुबोधने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘प्रिया मराठे, एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही,’ असं त्याने लिहिलंय.
”तू भेटशी नव्याने’ या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना,’ अशा शब्दांत सुबोधने शोक व्यक्त केला.
2023 मध्ये प्रियाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका मधेच सोडली होती. आरोग्याचं कारण देत तिने मालिकेचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ती सोशल मीडियावरही फार सक्रिय नव्हती. इन्स्टाग्रामवर प्रियाची वर्षभरापूर्वी शेवटची पोस्ट आहे.
प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.