ना करिश्माची मुलं ना तिसऱ्या पत्नीचा मुलगा..; ही व्यक्ती बनली संजय कपूरच्या कंपनीची उत्तराधिकारी

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनानंतर आता त्याच्या कंपनीचा उत्तराधिकारी कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याचं उत्तर आता कंपनीकडून देण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूरचं निधन झालं होतं.

ना करिश्माची मुलं ना तिसऱ्या पत्नीचा मुलगा..; ही व्यक्ती बनली संजय कपूरच्या कंपनीची उत्तराधिकारी
करिश्मा कपूर, संजय कपूर आणि त्यांची मुलं
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2025 | 9:35 AM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या 53 व्या वर्षी संजयने अखेरचा श्वास घेतला. तो जगातील आघाडीच्या मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक असलेल्या सोना कॉमस्टारचा अध्यक्ष आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होता. संजयच्या अकस्मात निधनानंतर आता त्याच्या कंपनीकडून पहिलं निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर आता कंपनीला कोण सांभाळणार याची माहिती या निवेदनातून देण्यात आली.

संजय कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत या निवेदनात कंपनीने म्हटलंय, “सोना कॉमस्टारचे माजी अध्यक्ष संजय कपूर यांच्या अकस्मात निधनाबद्दल कपूर कुटुंबाप्रती संचालक मंडळ शोक व्यक्त करते. त्यांची दूरदृष्टी, मूल्ये आणि उत्कृष्ट कामगिरी ही या कंपनीला मोठ्या उंचीवर घेऊन गेली. ते कायम आम्हाला प्रेरणा देत राहतील. कंपनीच्या संचालक मंडळाने 2019 पासून व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विवेक विक्रम सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक व्यावसायिक व्यवस्थापन पथक तयार केलं आहे. मंडळाच्या देखरेखीखाली कंपनीचं नेतृत्व करण्याच्या व्यवस्थापन पथकाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

“कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक योग्य वेळी होईल, ज्यामध्ये मंडळाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. आम्ही आमच्या ग्राहकांना, व्यावसायिक भागीदारांना, कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना खात्री देऊ इच्छितो की कंपनी सर्वसामान्यपणे कार्य करत आहे आणि व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही”, असंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.

संजयच्या निधनानंतर करिश्मासोबतचा त्याचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करिश्मा आणि संजय विभक्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. तर दुसरीकडे करिश्माने एकल मातृत्वाचा स्वीकार करत दोन्ही मुलांचं संगोपन केलं. घटस्फोटानंतर संजय त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी करिश्माला दर महिन्याला मोठी रक्कम देत होाता. आता संजयच्या निधनानंतर करिश्माला ती रक्कम मिळणं बंद होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करिश्मा आणि संजय यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा ताबा करिश्माला मिळाला. तर संजयला वेळोवेळी मुलांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली.