करिश्मा कपूरला झटका; पूर्व पतीच्या निधनानंतर आता दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
बिझनेसमन संजय कपूर हा अब्जावधी संपत्तीचा मालक होता. घटस्फोटानंतर तो अभिनेत्री करिश्मा कपूरला दर महिन्याला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यायचा. मुलांच्या संगोपनासाठी करिश्माला संजयकडून भरभक्कम रक्कम मिळायची. आता ही रक्कम बंद होणार का?

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं नुकतंच निधन झालं. वयाच्या 53 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याने आपले प्राण गमावले. गेल्या अनेक वर्षांपासून संजय इंग्लंडमध्ये स्थायिक असून तिथेच पोलो खेळताना त्याच्या तोंडात मधमाशी गेली. मधमाशीने घशाला डंख मारल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण जाणवली आणि त्यातून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जात आहे. संजयला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संजयच्या निधनानंतर करिश्मासोबतचा त्याचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करिश्मा आणि संजय विभक्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. तर दुसरीकडे करिश्माने एकल मातृत्वाचा स्वीकार करत दोन्ही मुलांचं संगोपन केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर संजय त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी करिश्माला दर महिन्याला मोठी रक्कम देत होाता. आता संजयच्या निधनानंतर करिश्माला ती रक्कम मिळणं बंद होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करिश्मा आणि संजय यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा ताबा करिश्माला मिळाला. तर संजयला वेळोवेळी मुलांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा संजयने खार इथलं त्याच्या वडिलांचं घर करिश्माच्या नावे केलं होतं, असंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर संजयने 14 कोटी रुपयांचा बाँडसुद्धा त्याच्या मुलांच्या नावावर खरेदी केलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजयच्या निधनानंतर करिश्माला मिळणाऱ्या मोठी रकमेवर पूर्णविराम लागू शकतो. परंतु यावर अद्याप वकिलांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. घटस्फोटानंतर संजयने त्याच्या मुलांसाठी पुरेसा वेळ दिल्याचं पहायला मिळालं. अनेकदा तो मुलांना घेऊन फिरायला जात असे.
मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्या संगोपनासाठी संजय दर महिन्याला करिश्माला 10 लाख रुपये देत होता. संजय कपूर तब्बल 10,300 कोटी रुपयांचा मालक होता. दिल्ली, मुंबईशिवाय लंडनमध्येही त्याची बरीच संपत्ती आहे. घटस्फोटानंतर करिश्माला संजयकडून पोटगी म्हणून 70 कोटी रुपये मिळाले होते.
संजय आणि करिश्मा यांचं 2003 मध्ये धूमधडाक्यात लग्न झालं होतं. परंतु लग्नानंतर करिश्माने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अखेर तिने 2014 मध्ये कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान करिश्माने संजयवर कौटुंबिक हिंसाचाराचाही आरोप केला होता. इतकंच नव्हे तर संजयने मला त्याच्या मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव टाकला होता, असाही गंभीर आरोप करिश्माने केला होता. तर करिश्माने फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न केल्याचा पलटवार संजयने केला होता.
