अमृता सिंहसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सनी देओलचं रोखठोक उत्तर; म्हणाला “पकडून मारावंसं..”

सनी देओल आणि अमृता सिंह यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी चांगली होती की ऑफस्क्रीनसुद्धा त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. एका मुलाखतीत सनी देओलला याविषयी प्रश्न विचारला असता त्याने रोखठोक उत्तर दिलं.

अमृता सिंहसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सनी देओलचं रोखठोक उत्तर; म्हणाला पकडून मारावंसं..
Sunny Deol and Amrita Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2026 | 11:29 AM

अभिनेता सनी देओलला बॉलिवूडचा ‘एंग्री मॅन’ म्हटलं जातं. सर्वांत ‘रफ अँड टफ’ दिसणारा सनी खऱ्या आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ता आहे. जे मनात आहे, तेच त्यांच्या मुखात असतं आणि त्याचा हाच बिनधास्त अंदाज चाहत्यांना सर्वाधिक आवडतो. सनी देओल अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंहशी अनेकदा जोडलं गेलं होतं. या दोघांनी 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा सनी देओलचा पदार्पणातील चित्रपट होता. त्यानंतर 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनी’ या चित्रपटातही दोघं ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसले. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की ऑफस्क्रीनसुद्धा त्यांच्या अफवांच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याकाळी सनी आणि अमृताच्या अफेअरची चर्चा हा अनेक मॅगझिन्सचा मुख्य विषय असायचा.

अमृतासोबतच्या अफेअरच्या चर्चा होत असतानाच सनी देओलने पूजा देओलशी साखरपुडा केला होता. अशातच एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, या अफेअरच्या चर्चांचा पूजावर काही परिणाम होतो का? त्यावर सनी देओलने जे उत्तर दिलं होतं, त्याची आजही चर्चा होते. मुलाखतीत सनी देओल म्हणाला होता, “मी सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच पाहिलं होतं की लोक काय लिहितात आणि काय म्हणतात? हे सर्व सहन करावं लागतं, ऐकावं लागतं. कधीकधी खूप राग येतो, जेव्हा बरंच काही उलटसुलट लिहिलं जातं. मग अशा वेळी कोणी भेटलं तर त्याला पकडायचं आणि मारायचं. अजून काय करणार? (हसतो).”

सनी देओलने 1984 मध्ये पूजाशी लग्न केलं होतं. पूजा नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत चर्चेतल्या अभिनेत्याची पत्नी असूनही पूजा साधेपणानं जगते. या दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुल आहेत. या दोघांनीही वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तर राजवीरने ‘दोनों’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत एण्ट्री केली.

Follow Us