
बॉलिवूड जेवढं ग्लॅमरस आहे तेवढेच त्यात अनेक वाईट अनुभवही आहेत. जे प्रत्येकाच्या आयुष्यावर एक वेगळा परिणाम करतात. त्यातीलच एक म्हणजे कास्टिंग काउच. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कास्टिंग काउच आणि त्यांसोबत घडलेल्या विचित्र प्रसगांबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. आता, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एका अभिनेत्रीनेही अशाच काही धक्कादायक प्रसंगांचे खुलासे केले आहेत.
ही अभिनेत्री म्हणजे सुरवीन चावला. तिने अशा काही घटनांबद्दल सांगितल्या ज्यांनी तिला हादरवून टाकले. एका मुलाखतीत, सुरवीनने खुलासा केला की तिला असे अनुभव एकदा नाही तर अनेक वेळा आले आहेत.
‘सायकलवर बसला आणि घाणेरडे काम करू लागला…’
सुरवीनने तिला आलेला एक अनुभव सांगत म्हटलं आहे की “ही एक जुनी गोष्ट आहे. मी त्यावेळी नववीत होते आणि संध्याकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. मला अजूनही आठवते की एक माणूस सायकलवरून जात होता. त्याने मला त्याच्याकडे बोलावलं आणि मी त्याच्याकडे जाऊ लागले तेव्हा मला दिसलं की तो त्याच्या पँटमधून काहीतरी काढत आहे. यानंतर, तो सायकलवर बसला आणि घाणेरडे काम करू लागला.हे पाहून मग मी यू-टर्न घेतला आणि तिथून पळून गेले.”
मेंदूवर वाईट परिणाम होतो…
सुरवीन पुढे म्हणाली, “त्यावेळी मला काय चाललंय ते समजत नव्हतं, पण मला खूप विचित्र वाटलं आणि मी त्याच्याकडे गेले नाही.” सुरवीन म्हणाली की, जर लहान असताना मुलींसोबत अशा काही घटना घडल्या तर त्यांना त्यावेळी काहीही समजत नसले तरी, या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो.
दिग्दर्शकाचा जबरदस्ती कीस करण्याचा प्रयत्न
यानंतर, सुरवीनने इंडस्ट्रीमधील तिच्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दलही सांगितले. सुरवीन म्हणाली, “मी इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा कास्टिंग काउचचा अनुभव घेतला आहे. मी तुम्हाला मुंबईतील वीरा देसाई रोडवरील एक गोष्ट सांगते . एकदा ऑफिसच्या केबिनमध्ये झालेल्या बैठकीनंतर एक दिग्दर्शक मला गेटवर सोडण्यासाठी आला. मी त्यावेळी विवाहित होते आणि बैठकीदरम्यान आम्ही माझ्या पतीबद्दलही बोललो होतो. असे असूनही, जेव्हा मी निरोप घेऊ लागले तेव्हा तो मला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न करू लागला. ती परिस्थितीत पाहता मला त्याला मागे ढकलावं लागलं. त्याच्या या कृतीने मी हैराण झाले होते. तेव्हा मी त्याला ‘तू काय करतोयस’ असं थेट विचारलं आणि तिथून निघून गेले.” या प्रसंगांबद्दल सांगत तिने मुलींना सावध करण्याचाच प्रयत्न केला आहे.
‘इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचसारख्या गोष्टी घडतात पण…’
सुरवीन पुढे म्हणाली की, “इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचसारख्या गोष्टी घडत राहतात, पण भीतीमुळे त्या बाहेर येऊ शकत नाहीत. ती म्हणाली की हे अनुभव खूप त्रासदायक आहेत आणि हे सर्व बऱ्याच काळापासून सुरु आहे”