“स्वत:ला मारून पुन्हा जन्म घेऊ का?”; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा ट्रोलर्सना सवाल

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. मात्र त्याचसोबत वीरला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय.

स्वत:ला मारून पुन्हा जन्म घेऊ का?; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा ट्रोलर्सना सवाल
Veer Pahariya and Sushilkumar Shinde
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2025 | 9:50 AM

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वीरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. प्रतिष्ठित कुटुंबातून आल्याने वीरला फिल्म इंडस्ट्रीत सहज संधी मिळाली, असं काहींनी म्हटलंय. तर काहींनी दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वीर या ट्रोलिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. वीर हा सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे आणि मोठे उद्योजक संजय पहाडिया यांचा मुलगा आहे.

मोठ्या कुटुंबात जन्माला आल्याने संधी मिळाल्याबद्दल अनेकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत, यावर तुझं काय म्हणणं आहे, असा सवाल वीरला करण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “यात मी काय करू शकतो? अशा कुटुंबात जन्माला येणं हे माझं सौभाग्य आहे. आधीपासून माझं स्वप्न हेच होतं की मला कलाकार बनायचं आहे. मग आता त्यांना खुश करण्यासाठी मी काय करू? स्वत:ला मारून पुनर्जन्म घेऊ का?”

“प्रचंड मेहनत घेणं आणि कामाप्रती समर्पित राहणं हेच मी करू शकतो. जेणेकरून या इंडस्ट्रीतील माझ्या स्थानाला मी न्याय देऊ शकेन. मी अशी नकारात्मकता पाहत नाही. ज्यांनी चित्रपट पाहिला नसेल, त्यांचं द्वेष पसरवणं मी समजू शकतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कदाचित या चित्रपटाच्या माध्यमातून मी अद्याप प्रेक्षकांची मनं जिंकू शकलो नाही. पण यापुढच्या चित्रपटातून मी प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. या द्वेषाचं रुपांतर प्रेमात करण्यासाठी मी खूप मेहनत करेन”, असं वीर म्हणाला.

‘स्काय फोर्स’ हा 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानमधील सरगोधा एअरबेस हल्ल्यावर आधारित चित्रपट आहे. हा भारताचा पहिला हवाई हल्ला मानला जातो. अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्यासोबत चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी दिग्दर्शित या चित्रपटाने गेल्या आठ दिवसांत 104 कोटी रुपयांची कमाई केली आहे.