
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जीवित तसंच मालमत्तेची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. यादरम्यान मराठमोळा अभिनेता सुयश टिळक कोलंबो एअरपोर्टवर अडकला होता. तब्बल 38 तासांच्या प्रतीक्षेनंतर सुयश भारतात सुखरुप भारतात परतला. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली. ‘श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे’, अशा शब्दांत त्याने अनुभव सांगितला आहे. ‘काल संध्याकाळपासून कोलंबो एअरपोर्टवर अडकलोय. आमच्या विमानाने भारताला जाण्यासाठी टेक ऑफ करावं याची आशा आहे. श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर हे सर्व ठीक होवो, अशी अपेक्षा करतो’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.
तब्बल 38 तासांनंतर जेव्हा तो भारतात पोहोचला, तेव्हा त्याने आणखी पोस्ट लिहिलं. ‘अखेर कोलंबोमधून आमच्या विमानाने टेक-ऑफ केलं आणि 38 तासांनंतर मी भारतात पोहोचलोय. लोकांनी अक्षरश: आशा सोडली होती. या घटनेत मी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. अनोळख्या लोकांना मित्र बनवले, प्रत्येकाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सोबत स्वत:ही अस्वस्थ होणार नाही याची काळजी घेतली, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या, निराश झालेल्यांना समजावलं, हा सर्व एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष होता. ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या, त्या सर्वांचे मी आभार मानतो.’
‘आवाज चढवणं, शिवीगाळ करणं, भांडणाची सुरुवात करणं आणि ओरडत तमाशा करणं हे कधीच कोणत्या गोष्टीवर उपाय ठरू शकत नाहीत. ज्या लोकांना असं वाटतं आणि जे लोक असं वागतात त्यांनी कृपया ते थांबवावं. अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवून परिस्थितीला समजून घेणं आणि माणुसकीतून इतरांची मदत करणं गरजेचं असतं. श्रीलंकेच्या एअरपोर्ट प्रशासनाने ज्या पद्धतीने हे प्रकरण सांभाळलं, त्यासाठी मी त्यांना सलाम करतो. श्रीलंकेतील भारतीय दूतावासातील सर्व अधिकाऱ्यांचे मी विशेष आभार मानतो. श्रीलंकेतील एअरलाइन्सच्या केटरिंग कर्मचाऱ्यांनी 48 तासांपेक्षाही अधिक काळ अथक परिश्रम करून एकमेकांना आशा आणि बळ दिलं’, अशा शब्दांत सुशयने कृतज्ञता व्यक्त केली.
‘श्रीलंकेला इतका मोठा फटका बसला असताना, त्यांच्या देशातील लोकांची घरं वाहून जात असताना, माणसं पुरात बुडाली असतानाही ते प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे स्वत:चे नातेवाईक बेपत्ता आहेत. त्यांना फक्त प्रवाशांचा विश्वास हवा आहे, ज्यामुळे त्यांना परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्यास मदत होईल’, असं सुयशने लिहिलं आहे.