
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वी स्वराने गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. आता नुकतंच तिने प्रेग्नंसी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. मात्र त्यावरूनही स्वरा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. प्रेग्नंसी फोटोशूट करतानाही स्वराने नवा वाद ओढवून घेतला आहे. कारण भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने हे प्रेग्नंसी फोटोशूट केलं आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात स्वराने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी लग्न केलं. लग्नाच्या चार महिन्यांतच स्वराला नव्या पाहुण्याची चाहुल लागली. ऑक्टोबर महिन्यात स्वरा आणि अहमदच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आता तिने भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये मॅटर्निटी फोटो शूट केलं आहे. स्वराच्या या फोटोशूटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ‘गरोदरपणाचा काळ हा इतर कोणत्याही ग्लॅमर टाइमपेक्षा उत्तम असतो’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी स्वरावर भगव्या रंगाच्या ड्रेसमुळे टीका केली आहे.
स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली. स्वराने तिच्या लग्नाविषयीची माहिती देताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये स्वराने तिची लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली होती.
स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 2019 आणि 2020 मधील आंदोलनांची झलक पहायला मिळाली होती. या आंदोलनातच दोघांच्या कहाणीची सुरुवात झाली होती. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती. या व्हिडीओत पुढे दाखवलं गेलं की गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं होतं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.