
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. यामधील जेठालाल आणि बबिताजी यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. गेल्या 17 वर्षांपासून या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बबिताजीसोबतच्या केमिस्ट्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. दोघांच्या केमिस्ट्रीची विशेष काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तारक मेहता..’ ही कौटुंबिक मालिका असल्याने काही गोष्टींचं ते काटेकोर पालन करतात. याच गोष्टींविषयी त्यांनी खुलासा केला आहे. यामध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता बबिताजीच्या भूमिकेत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले, “एक अभिनेता म्हणून माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की अश्लीलता आणि निरागसता यांच्यात एक बारीक रेष असते, ती कधीच न ओलांडण्याची काळजी आम्ही घेतो. सुरुवातीच्या दिवसांत आम्ही शूटिंगसाठी अहमदाबादला गेलो होतो. आम्ही तिथल्या एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथे सगळ्याच लोकांना आमची मालिका खूप आवडते. मी ज्याप्रकारे बबिताजी हा डायलॉग म्हणतो, ते त्यांना खूप भावतं. जर तुम्ही समाजाचा विचार केला तर, हे खूप वेगळं नातं आहे आणि लोक त्याचा स्वीकार करत आहेत. कारण त्यात निरागसता आहे. एक अभिनेता आणि एक पटकथालेखक म्हणून आम्ही योग्य मार्गावर आहोत.”
‘तारक मेहता..’ या मालिकेत जेठालाल आणि बबिता हे दोन्ही पात्र त्यांच्या जोडीदाराशी विवाहित आहेत. परंतु तरीही जेठालाल बबिताला पसंत करत असतो. असं असलं तरी या दोघांमधील दृश्ये किंवा संवाद कधीच आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आली नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोक ही मालिका आवडीने बघत असल्याने याबद्दलची विशेष काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतून दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता गायब असल्याने त्यांनी ‘तारक मेहता..’ सोडल्याची जोरदार चर्चा होती. परंतु नंतर निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी कामातून सुट्टी घेतली होती. म्हणूनच ते मालिकेत दिसत नव्हते.