‘तारक मेहता..’मध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्विस्ट; पाहून प्रेक्षकही थक्क!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आतापर्यंतचा मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या एपिसोडचा प्रोमो पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. हे सत्य आहे की स्वप्न आहे, असा सवाल प्रेक्षक करत आहेत.

तारक मेहता..मध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्विस्ट; पाहून प्रेक्षकही थक्क!
सोनू आणि टप्पू
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2025 | 10:58 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील काही कलाकारसुद्धा बदलले. मात्र तरीसुद्धा ‘तारक मेहता..’ची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. आता या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. मालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा ट्विस्ट असेल. हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकसुद्धा थक्क होणार आहेत. कारण गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू भिडे हिनं जेठालालचा मुलगा टप्पूशी लग्न केलंय.

सोनू आणि टप्पूने त्यांच्याच सोसायटीमधील मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलंय. तर या लग्नाला विरोध करणारे भिडे मास्तर हे त्यांच्या पत्नीसोबत थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. सोनू आणि टप्पूच्या या लग्नाला त्यांचा स्पष्ट विरोध आहे. सोनू ही आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी आहे. तर टप्पू हा जेठालाल आणि दयाबेन यांचा मुलगा आहे. टप्पू आणि सोनू मंदिरात लग्नबंधनात अडकतात. त्या दोघांना पाहून भिडे खूप नाराज होतात. इतकंच नव्हे तर मुलीला आणि जावयाला आशीर्वाद देण्यास ते नकार देतात.

दुसरीकडे बापूजी आणि जेठालालसुद्धा टप्पूकडे तक्रार करतात की त्याने त्यांच्या आणि आई दयाबेनच्या उपस्थितीत लग्न केलं नाही. एकुलत्या एका नातवाचं लग्न पाहण्याची इच्छा बापूजी बोलून दाखवतात. भिडे आणि माधवी त्यांच्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करतात. “तुला टप्पू आवडतो हे तू आम्हाला सांगायला हवं होतं”, असं माधवी सोनूला सांगते. त्यावर सोनू त्यांना म्हणते की, “जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुम्ही आमचं लग्न कधीच होऊ दिलं नसतं.”

सोनू आणि टप्पू एकमेकांसोबत लग्न करून खूप खुश आहेत. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर दोघं एकत्र बरेच फोटोसुद्धा क्लिक करतात. अखेर सर्वजण मिळून कुटुंबीयांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात. इतकंच नाही तर घरी परतण्याआधी दोन्ही कुटुंबीयांसोबत टप्पू आणि सोनू गरबासुद्धा खेळतात. हा संपूर्ण एपिसोड पोट धरून हसवणारा आणि तितकाच मनोरंजन आहे. तर हे खरंच घडत नसून भिडे मास्तर स्वप्न पाहत असावेत, असा अंदाज काही प्रेक्षक व्यक्त करत आहेत.