‘तारक मेहता..’मधील बापूजींच्या भूमिकेसाठी तब्बल 283 टक्कल; अखेर एकेदिवशी लढवली ही शक्कल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बापूजींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेते अमित भट्ट यांना बरीच मेहनत करावी लागते. नुकतंच त्यांना सेटवर गांधी टोपीशिवाय पाहिलं गेलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सब टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 28 जुलै 2018 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्माते असित कुमार मोदी यांनी कलाकारांसोबत मिळून सेटवर मोठा जल्लोष केला. यावेळी सर्व कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला. जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट हेदेखील तिथे उपस्थित होते. पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. अमित भट्ट मेकअप रुमकडे जात असताना त्यांचा एक अनोक लूक समोर आला.
अमित भट्ट हे या मालिकेत जेठालालचे वडील चंपकलाल गडाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत ते कायम गांधी टोपी घालून असतात. मंगळवारी जेव्हा त्यांनी ही टोपी काढली तेव्हा त्यांचे दाट काळे केस दिसले. कानाजवळ या केसांना पांढरा रंग आहे. यामुळे त्यांना बापूजींचा लूक मिळण्यास मदत होते. काही वर्षांपूर्वी ते बापूजींच्या भूमिकेसाठी थेट टक्कलच करायचे. एका मुलाखतीत त्यांनी चंपकलालच्या लूकमागील कहाणी सांगितली होती.
पहा व्हिडीओ
अमित भट्ट यांनी खुलासा केला होता की, मालिकेच्या सुरुवातीला ते सर्व भागांचं शूटिंग विग घालूनच करायचे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कॅमेऱ्यावर त्यांचा लूक खरा दिसत नाही, तेव्हा ते सलूनमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचे सर्व केस कापून टाकले. या मालिकेतील बापूजींच्या लूकसाठी अमित भट्ट यांनी दहा-बारा वेळा नाही तर तब्बल 283 वेळा मुंडन केलं होतं. त्यानंतर त्यांनी एका एपिसोडमध्ये गांधी टोपी घातली. तेव्हापासून त्यांचा हा नवीन लूक तसाच राहिला.
आश्चर्याची बाब म्हणजे अमित भट्ट हे मालिकेत जरी जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात ते दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. ‘तारक मेहता..’च्या आधी दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केलं होतं. 18 वर्षांनंतरही त्यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
50 वर्षीय अमित भट्ट यांना ‘तारक मेहता..’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी दिलीप जोशी यांच्यासोबत ‘एफआयआर’सारख्या लोकप्रिय मालिकेतही काम केलंय. डीएनएच्या वृत्तानुसार, अमित भट्ट यांना एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये मानधन मिळतं.