Raj Hanchanale : ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता झाला बाबा, अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना, म्हणाला, इतकं हतबल…
Zee Marathi Actor Raj Hanchanale : 'सनई चौघडे' फेम राज हंचनाळे बाबा झाला असून अभिनेत्याला मुलगी झाली आहे. राजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे‘ या मालिकेत जय खानोलकरची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुड न्यूज दिली आहे. राज बाबा झाला असून अभिनेत्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजला 19 ऑक्टोबर 2026 रोजी कन्यारत्न प्राप्त झालं.
राज हंचनाळेनं व्यक्त केल्या भावना
राज हंचनाळेनं सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘आयुष्यात काही क्षण असे असतात, जे तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकतात. इतकं हतबल आयुष्यात कधीच वाटलं न्हवतं, आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला असह्य वेदनांमधून जाताना पाहणं…आणि तरीही तिच्यासाठी काहीच करू न शकणं. आपण फक्त उभे असतो, तिच्या वेदनांचे साक्षीदार बनून. मनात एकच विचार येत असतो, ‘देवा, मला तिच्यासाठी काहीतरी करू दे. तिच्या जागी मी हे सगळं सहन करू शकलो असतो तर…’ पण त्या क्षणी जाणवतं, प्रेम करणं आणि प्रेमासाठी वेदना सहन करणं यात किती मोठा फरक आहे. आपण स्त्रियांबद्दल बोलतो, त्यांचा आदर करतो, त्यांना समान हक्क मिळावेत म्हणून चर्चा करतो. पण एका स्त्रीला आई होताना पाहिल्याशिवाय तिच्या सामर्थ्याची खरी जाणीव होते का? ज्या वेदनांपुढे आपण असहाय्य होतो, त्याच वेदनांना सामोरं जाण्याचं धैर्य ती दाखवते. स्वतःच्या शरीराच्या, मनाच्या आणि अस्तित्वाच्या सीमा ओलांडून ती एका नव्या जीवाला या जगात आणते. त्या क्षणी स्त्री फक्त स्त्री राहत नाही…ती साक्षात देवी वाटते.’
View this post on Instagram
‘स्त्रीला कमी लेखणाऱ्या, तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभ करणाऱ्या आणि तिला स्वतःच्या समानतेसाठी लढायला भाग पाडणाऱ्या विचारांची लाज वाटते. स्त्रियांनी समानतेसाठी लढणं थांबवावं, कारण त्या प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या पुढेच आहेत. तिच्या वेदना मी वाटून घेऊ शकलो नाही, पण त्या वेदनांनी माझ्यातला माणूस बदलून टाकला. तिच्याबद्दलचं प्रेम आणखी वाढलं, तिच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आणि तिच्या आईपणासमोर मी नतमस्तक झालो. आज मला माझ्या मुलीला एक वचन द्यायचं आहे, ‘तुला कधीही तुझं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कुणाशी लढावं लागू नये, असं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. तुला शिकवेन की, तू कोणाहीपेक्षा कमी नाहीस, तुझं स्वातंत्र्य आणि तुझा आवाज यांना स्वतःचं अस्तित्व आहे.’
‘आज मी फक्त बाबा नाही झालो…आज मी स्त्रीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नव्याने बदलू शकलो.’ असंही राजनं शेवटी म्हटलं आहे.
