रोशन सिंग सोढी बेपत्ता, मिसेस सोढीचा मोठा खुलासा, शेवटच्या भेटीत काय घडलं?

Taarak Mehta ka Ooltah Chashmah | काही दिवसांपासून रोशन सिंग सोढी बोपत्ता... मिसेस सोढी कडून शेवटच्या भेटीचा मोठा खुलासा, तेव्हा नक्की काय घडलं होतं? रोशन सिंग सोढी उर्फ अभिनेता गुरुचरण सिंग आर्थिक अडचणींचा करत होता सामना... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

रोशन सिंग सोढी बेपत्ता, मिसेस सोढीचा मोठा खुलासा, शेवटच्या भेटीत काय घडलं?
| Updated on: Apr 30, 2024 | 8:08 AM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण सिंग बेपत्ता असल्यामुळे पोलीस चारही बाजूंनी चौकशी करत आहे. चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता दिसून आला… पण त्यानंतर अभिनेता कुठे गेला आणि कसा आहे? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गुरुचरण सिंग बेपत्ता असल्यामुळे चाहते देखील चिंतेत आहेत. गुरुचरण सिंग कुठे आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नसताना अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने अभिनेत्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

जेनिफर मिस्त्री हिने मालिकेत गुरुचरण सिंग म्हणजे रोशन सिंग सोढी याची पत्नी मिसेस सोढी ही भूमिका साकारली होती. गुरुचरण सिंग आणि जेनिफर मिस्त्री यांची शेवटची भेट 2023 मध्ये झाली होती. असित मोदी यांच्या विरोधात सुरु असलेल्या केस संदर्भात अभिनेत्री गुरुचरण सिंग याला भेटली होती.

गेल्या वर्षी जेनिफर हिने गुरुचरण सिंग याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तेव्हा गुरुचरण सिंग याने असिद मोदी याच्या विरोधात सुरु असलेल्या केसमध्ये तुझ्यासोबत आहे… असं वचन देखील अभिनेत्रीला दिलं होतं. अशात अचानक अभिनेता कुठे गेला? याची चिंता अभिनेत्याचे कुटुंबिय, चाहते आणि मित्र-परिवाराला सतावत आहे.

जेनिफर मिस्त्री म्हणाली, ‘आमचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा गुरुचरण सिंग आनंदी दिसत होता. तो कायम स्वतः आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांना देखील आनंदी ठेवायचा… त्याने मला आध्यात्माकडे वळण्याचा देखील सल्ला दिला होता…’ सध्या सर्वत्र अभिनेता बेपत्ता असल्याची चर्चा सुरु आहे.

रिपोर्टनुसार, 24 एप्रिल पर्यंत गुरुचरण सिंग दिल्लीमध्येच होता. त्यानंतर त्याचा फोन ऑफ झाला. अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि गुरुचरण सिंग लवकरच लग्न देखील करणार होता… अशी माहिती देखील समोर येत आहे. अभिनेता कुठे आणि कसा आहे… याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत होता. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता मालिकेत सक्रिय नसला तरीही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नव्हती. अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता.