Tanishaa Mukerji : ही तर माफियागिरी! लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत म्हणाली, कृपया इकडे येऊन…
Tanishaa Mukerji : तनिषा मुखर्जीच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ही घटना लोणावळ्यातील अभिनेत्रीच्या वडिलोपार्जित घरी घडली. यानंतर तनिषानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत मागितली आहे.

काजोलची बहीण, अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ७’ फेम तनिषा मुखर्जीनं महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर (MSEB) आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्रीनं आरोप केला आहे की, जास्त वीज बिलामुळे लोणावळ्यातील तिच्या वडिलोपार्जित घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अभिनेत्रीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे.
तनिशा मुखर्जीची पोस्ट
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी तनिषाची पुण्यातील लोणावळ्यात एक जुनी वडिलोपार्जित मालमत्ता आहे. अभिनेत्री विशेष प्रसंगी आणि सुट्ट्यांमध्ये अनेकदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिथे जाते. तनिषानं ट्विटरवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर टीका केली. तनिषा म्हणाली, ‘लोणावळा वीज मंडळ माफियागिरी करत आहे.’ पोस्टमध्ये, तनिषानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत लिहिलं की, ‘लोणाळ्यातील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ माफियासारखे वागत आहेत! ते अवाजवी बिल पाठवत आहेत आणि वीज कापून लोकांना पैसे भरण्यास भाग पाडत आहेत. हा एक गुन्हा आहे! बिलाची तारीख अजून आलेली नसतानाही ते शनिवारी संध्याकाळी वीज कापायला येत आहेत. त्यामुळे लोकांना ओलीस ठेवल्यासारखे वाटायला लागलं आहे.’
पोस्टच्या शेवटी, तनिषानं मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री अमित शाह, तसेच योगी आदित्यनाथ आणि टाटा पॉवर यांना टॅग करत लिहिलं, ‘कृपया लोणावळ्याला या! इथे कोणतेही नियम आणि कायदे नाहीत. त्यांना जे वाटेल तेच ते करतायत!’
Maharashtra state electricity board in lonavala are behaving like mafia ! They are giving huge bills and forcing payment by cutting off electricity. This is just criminal! Coming on a Saturday evening to cut off the electricity even if it is before the due date and just holding…
— Tanishaa S Mukerji (@TanishaaMukerji) September 29, 2026
दरम्यान, तनिषाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं २००३ मध्ये करण नाथ आणि डिनो मोरिया यांच्यासोबत ‘Sssshhh’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. त्यानंतर ती ‘सरकार’, ‘नील ‘एन’ निक्की’ आणि तमिळ हिट चित्रपट ‘उन्नाले उन्नाले’ मध्ये दिसली. २०१३ मध्ये, ती ‘बिग बॉस ७’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आणि पहिली उपविजेती ठरली. नंतर तनिषा ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७’ (२०१६) आणि ‘झलक दिखला जा ११’ मध्ये दिसली. तनिषा शेवटची २०१४ च्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती.