
प्रयागराजच्या महाकुंभमधून चर्चेत आलेली मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल सध्या ‘बिग बॉस 19’च्या घरात कैद आहे. बिग बॉसच्या घरात ती सतत तिच्या आलिशान लाइफस्टाइलविषयी बडेजाव करताना दिसते. यावरून सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. या ट्रोलिंगला वैतागून आता तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तान्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरच त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आपल्या मुलीबद्दल लोकांना बरंवाईट बोलताना पाहून अत्यंत दु:ख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचसोबत त्यांनी नेटकऱ्यांना हात जोडून एक विनंतीसुद्धा केली आहे.
‘देशातील सर्वांत मोठ्या रिॲलिटी शोमध्ये तान्याला पाहून ज्या मिश्र भावना आमच्या मनात आहेत, त्या आम्ही शब्दांत मांडू शकत नाही. एक पालक म्हणून तिला प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहणं अत्यंत अभिमानास्पद आहे. पण त्याच वेळी, लोकांकडून तिला खाली खेचलं जाताना, लक्ष्य बनवताना आणि जे तिला नीट ओळखतही नाहीत, अशांकडून तिच्याबद्दल क्रूर भाषा वापरताना पाहणं फार दु:खदायक आहे,’ असं त्यांनी लिहिलं.
या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, ‘तिच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना किंवा आरोप करणाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की, कोणतीही मतं बनवण्यापूर्वी तिचा प्रवास पूर्ण होईपर्यंतची प्रतीक्षा करा. किमान एवढा तरी तिचा हक्क आहे. तुमचे रील्स, आरोप कदाचित लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकतात, पण त्यामुळे काहींच्या मनावर आयुष्यभरासाठी जखमा होतात. आम्ही हात जोडून विनंती करतो की कृपया आम्हाला, तिच्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. आम्ही कधीच याची कल्पना केली नव्हती की आमची मुलगी, जिला आम्ही खूप प्रेमाने वाढवलं, तिला इतक्या नकारात्मकतेचा सामना करावा लागेल. तिच्यासाठी वापरला जाणारा प्रत्येक कठोर शब्द आम्हालाही इतका त्रास देतो की त्याची कल्पना तुम्ही कधीच करू शकणार नाही.’
‘आम्ही फक्त आशा करतो की मानवता आणि दयाळूपणा कायम राहील. तोपर्यंत, आम्ही आमच्या तान्याच्या पाठिशी प्रेमाने आणि विश्वासाने उभं राहू. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. जसं आम्ही तुला वाढवलंय, तसं बॉससारखं खंबीर राहा,’ असा संदेश त्यांनी तान्यासाठी दिला आहे.
तान्या मित्तलच्या आईवडिलांकडून जारी केलेल्या या निवेदनावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात काहींनी तान्याला पाठिंबा दिला आहे, तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या वागण्याला ‘फेक’ म्हणजेच खोटं म्हटलंय.