‘द काश्मीर फाईल्सच्या टीमला शोमध्ये का बोलावलं नाही’ विचारणाऱ्यांना कपिल शर्माचं उत्तर

सोशल मीडियावर 'बॉयकॉट कपिल शर्मा' हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होतोय. #BycottKapilSharmaShow या हॅशटॅगचा वापर करत नेटकरी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात (Kapil Sharma) संताप व्यक्त करत आहेत आणि त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

द काश्मीर फाईल्सच्या टीमला शोमध्ये का बोलावलं नाही विचारणाऱ्यांना कपिल शर्माचं उत्तर
#BycottKapilSharmaShow का होतोय ट्रेंड? 'द काश्मीर फाईल्स'शी आहे कनेक्शन
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2022 | 1:57 PM

सोशल मीडियावर ‘बॉयकॉट कपिल शर्मा’ हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होतोय. #BycottKapilSharmaShow या हॅशटॅगचा वापर करत नेटकरी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात (Kapil Sharma) संताप व्यक्त करत आहेत आणि त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू झाला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये (The Kashmir Files) मोठमोठे स्टार्स नसल्याने कपिल शर्माने आम्हाला त्यांच्या शोमध्ये बोलावलं नाही, अशा आशयाचं हे ट्विट होतं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटनंतर काही दिवस कपिलने या विषयावर मौन बाळगलं. मात्र आता त्याने एका नेटकऱ्याच्या ट्विटवर उत्तर देत अखेर मौन सोडलं आहे. ‘ज्या लोकांनी हेच सत्य आहे असं मानलंय, त्यांना स्पष्टीकरण देण्यात काय उपयोग’, असा टोला कपिलने ट्रोलर्सना लगावला आहे.

‘द काश्मीर फाईल्सला प्रमोट करण्यास कपिल का घाबरला? त्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती? विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या चित्रपटातील प्रतिष्ठित स्टारकास्टला निमंत्रण का दिलं नाही? भावा, मी तुझा खूप मोठा चाहता होतो, पण तू माझी आणि द कपिल शर्मा शोच्या लाखो चाहत्यांची निराशा केलीस’, असं ट्विट एका नेटकऱ्याने कपिलला टॅग करत केलं. त्यावर कपिल शर्माने उत्तर दिलं. ‘राठोड साहेब हे खरं नाहीये. तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, पण ज्यांनी या गोष्टीला सत्य मानलंय त्यांना स्पष्टीकरण देण्याचा काय उपयोग? एक अनुभवी सोशल मीडिया युजर म्हणून मी एक सल्ला देऊ इच्छितो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात एकतर्फी कथेवर कधीच विश्वास ठेवू नका’, असं कपिलने लिहिलं.

‘द काश्मीर फाईल्स’ची टीम ‘द कपिल शर्मा शो’वर का आली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं होतं. ‘द कपिल शर्मा शोमध्ये कोणी यावं याचा निर्णय मी घेत नाही. कोणाला आमंत्रित करायचं आहे हे तो आणि निर्माते ठरवतात. बॉलिवूडबद्दल बोलायचं झाल्यास, मी हेच म्हणेन जे एकदा बच्चन सरांनी गांधींबद्दल म्हटलं होतं, वो राजा हैं हम रंक.’ याच ट्विटनंतर त्यांनी चित्रपटात मोठा कमर्शिअल स्टार नसल्याने आमंत्रित केलं नसल्याचं म्हटलं होतं.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून दोन दिवसांत या चित्रपटाने 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर, प्रकाश बेलवडी, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा:

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?