Daya Ben: 5 वर्षांनंतर ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेन परत येतेय; निर्मात्यांनी दिली माहिती

मालिकेत दयाबेनची (Daya Ben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) जवळपास पाच वर्षांपूर्वी प्रसूती रजेवर गेली होती. मात्र पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही. निर्मात्यांनी अनेकदा तिला मालिकेत परत येण्याविषयी विचारणा केली होती.

Daya Ben: 5 वर्षांनंतर तारक मेहता..मध्ये दयाबेन परत येतेय; निर्मात्यांनी दिली माहिती
Disha Vakani
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 9:26 AM

गेल्या 14 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक भूमिकेने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, टप्पू, सोढी, आत्माराम भिडे हे मालिकेतील पात्रं घराघरात लोकप्रिय आहेत. मालिकेत दयाबेनची (Daya Ben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) जवळपास पाच वर्षांपूर्वी प्रसूती रजेवर गेली होती. मात्र पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही. निर्मात्यांनी अनेकदा तिला मालिकेत परत येण्याविषयी विचारणा केली होती. काही कारणास्तव दिशाने नकार दिला होता. आता मालिकेत दयाबेनची भूमिका परत येणार असल्याचं कळतंय. खुद्द निर्माते असित कुमार मोदी यांनी याबद्दलची माहिती दिली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “दयाबेन या भूमिकेला मालिकेत पुन्हा न आणण्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. मात्र गेल्या काही वर्षांत आपण सर्वांनीच कठीण काळाचा सामना केला. 2020-21 हा काळ सर्वांसाठी कठीण होता. पण आता आम्ही पुन्हा एकदा दयाबेनला मालिकेत आणण्याचा विचार करत आहोत. प्रेक्षकांना जेठालाल आणि दयाबेन यांच्यातील भन्नाट केमिस्ट्री आणि निखळ मनोरंजन पुन्हा एकदा अनुभवता येईल.”

दयाबेनच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दिशा वकानीच परत येणार का असा प्रश्न विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानीच परत येईल की नाही हे मला माहित नाही. दिशाजींसोबत आमचे अजूनही खूप चांगले नाते आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. पण आता तिचं लग्न झालंय, तिला मूलही आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यग्र झाला आहे. आपल्या सर्वांचं एक खासगी आयुष्य आहे आणि मला त्यावर कोणतीची कमेंट करायची नाही. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन, तुम्हाला मालिके दयाबेन नक्कीच पहायला मिळणार. एक टीम म्हणून आम्ही प्रेक्षकांचं आधीसारखं मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.”

2017 मध्ये दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यावेळी ती गरोदर होती. दिशाने मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर ती पुन्हा कामावर परतली नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये तिने फक्त एक खास फोन सीन शूट केला होता. त्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिशा वकानी पहायला मिळेल की दुसरी कोणी अभिनेत्री, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.