Dayaben: हे मां माताजी! ‘तारक मेहता..’मध्ये आता ‘दयाबेन’ कधीच परतणार नाही?

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये दयाबेनचा भाऊ सुंदर हा त्याच्या भावोजींना म्हणजेच जेठालालला फोन करून सांगतो की तो गोकुलधाम सोसायटीमध्ये लवकरच दयाबेनला घेऊन येणार आहे.

Dayaben: हे मां माताजी! तारक मेहता..मध्ये आता दयाबेन कधीच परतणार नाही?
Disha Vakani as Dayaben
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 9:58 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची (Dayaben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) मालिकेत परत येणार नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून दिशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या प्रोमोमध्ये दयाबेनचं कमबॅक होणार असल्याचं कळतंय. मात्र ही दयाबेन दिशा वकानी नसेल, असं निर्माते असितकुमार मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मालिकेत दयाबेन म्हणून कोणती अभिनेत्री झळकणार, याबद्दलची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय झालं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये दयाबेनचा भाऊ सुंदर हा त्याच्या भावोजींना म्हणजेच जेठालालला फोन करून सांगतो की तो गोकुलधाम सोसायटीमध्ये लवकरच दयाबेनला घेऊन येणार आहे. एका प्रोमोमध्ये तो दोन दिवसांत दयाबेनला घेऊन येणार असल्याचं सांगतो. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये तो प्लॅनमध्ये थोडा बदल झाला असून आणखी एक दिवस लागणार असल्याचं सांगतो. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी दिशा वकानीला पुन्हा मालिकेत आणण्याची विनंती केली आहे.

पहा मालिकेचा नवीन प्रोमो-

याबद्दल ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत असित म्हणाले, “मालिकेत दयाबेन ही भूमिका नक्कीच परतणार आहे. मात्र ती भूमिका दिशा वकानी साकारणार नाही. दिशाच्या जागेवर दुसरी अभिनेत्री शोधण्यासाठी आम्ही बरेच ऑडिशन्स घेतले आहेत आणि एका अभिनेत्रीवर आम्ही शिक्कामोर्तब केला आहे. दिशाच्या जागी दुसरी अभिनेत्री शोधण्यासाठी आम्हाला इतका वेळ लागला, कारण लग्नानंतर तिने काही काळ मालिकेत काम केलं होतं. मात्र बाळंतपणासाठी तिने ब्रेक घेतला आणि नंतर परतलीच नाही. तिने मालिका सोडली नव्हती. दिशा पुन्हा कामावर परतेल अशी आम्हाला आशा होती. पण तेव्हाच कोरोना महामारी, लॉकडाउन ही संकटं आली. त्यावेळी शूटिंगवरही बऱ्याच मर्यादा होत्या. आम्ही मालिकेच्या सेटवर सर्व नियमांचं पालन करत होतो, पण तरी दिशा शूटिंगला परतण्यासाठी घाबरत होती.”

दिशाने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. यादरम्यान तिने मुलीला जन्म दिला. स्तुती पाडिया असं तिच्या मुलीचं नाव आहे. मध्यंतरीच्या काळात ती मालिकेत परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यादरम्यान ती पुन्हा गरोदर होती. दिशाने मुलाला जन्म दिला आणि त्याच्या संगोपनासाठी आपली सुट्टी वाढवून घेतली. आता मालिकेत ती परतणार नसल्याचं कळताच चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.