Vishakha Subhedar: हास्यजत्रेतून निरोप घेतल्यानंतर विशाखा सुभेदारची ‘या’ मालिकेतून एण्ट्री

'थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीचं काम करायचं आहे. मंडळी कायम लोभ असावा. आता तूर्तास जत्रेतून राम राम पण नक्कीच दुसऱ्या भूमिकेतून दिसेनच’, असं विशाखाने तिच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Vishakha Subhedar: हास्यजत्रेतून निरोप घेतल्यानंतर विशाखा सुभेदारची या मालिकेतून एण्ट्री
Vishakha Subhedar
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 8:32 AM

जवळपास तीन महिन्यांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित हास्यजत्रेचा प्रवास थांबवत असल्याचं जाहीर केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या कॉमेडी शोमधून तिने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. दमयंती दुधखुळे असं या पात्राचं नाव असून ती विवाह सल्लागार असेल. अभिनेत्री विशाखा सुभेदार ही दमयंती दुधखुळेची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

ठिपक्यांची रांगोळी मधील या भूमिकेविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाली, “मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे. दमयंती दुधखुळे नावावरुनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येतो. अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवते. त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल.”

‘थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीचं काम करायचं आहे. मंडळी कायम लोभ असावा. आता तूर्तास जत्रेतून राम राम पण नक्कीच दुसऱ्या भूमिकेतून दिसेनच’, असं विशाखाने तिच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानुसार ती दुसऱ्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.