फक्त सहा महिने… वेट अँड वॉच… थलपती विजय यांनी भेटल्यानंतर कमल हासन यांचं विधान चर्चेत; काय घडणार असं?

तामिळनाडूत थलपती विजय यांनी सरकार स्थापन केल्यानंतर कमल हासन यांनी त्यांची भेट घेतली. विजय यांना काम करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी द्यावा, असे मत हासन यांनी व्यक्त केले. नव्या नेत्यांकडून लगेच अपेक्षा ठेवणे घाईचे ठरेल असेही ते म्हणाले.

फक्त सहा महिने... वेट अँड वॉच... थलपती विजय यांनी भेटल्यानंतर कमल हासन यांचं विधान चर्चेत; काय घडणार असं?
कमल हासन यांचं विधान चर्चेत
| Updated on: May 18, 2026 | 2:57 PM

थलपती विजय यांनी अखेर तामिळनाडूत सरकार स्थापन केलं आहे. आवश्यक मतांची बेगमी केल्यानंतर थलपती विजय यांनी बहुमतही सिद्ध केलं. त्यामुळे राज्याला एक स्थिर सरकार मिळालं आहे. थलपती विजय यांची राजकारणातील ही पहिलीच इनिंग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांनी दिलेली आश्वासने तरी त्यांनी किमान पूर्ण करावी अशी मागणी होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध अभिनेते, मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष तसेच खासदार कमल हासन यांनी थलपती विजय यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच सरकारचं मोजमाप काढू नये. तसं करणं फार घाई होईल. दोन दिवसात काहीही भाष्य करणं म्हणजे ती केवळ भविष्यवाणी ठरेल. ज्योतिषी खेळ होईल. हेच सहा किंवा 15 दिवसालाही लागू आहे. त्यामुळे थलपती विजय यांना किमान सहा महिन्याचा वेळ दिला पाहिजे. तसेच थलपती विजय यांच्यासोबत राजकारणात आलेल्या नवीन लोकांकडेही संशयाने पाहू नये. ते काम करू शकतील की नाही? अशी भावना मनात आणू नये, असं कमल हासन यांनी म्हटलंय.

फार अपेक्षा नको

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ज्या नेत्यांनी देशाचं नेतृत्व केलं, सत्ता सांभाळली, ते सुद्धा पहिल्यांदा राजकारणात आले होते. अनेक नवीन लोक यावेळी सरकारमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना कमी लेखू नये. तसेच त्यांच्याकडून लगेच काही घडेल असं समजू नये. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत, असंही कमल हासन यांनी स्पष्ट केलं.

आम्ही सतर्क

आम्ही मतदारांना आधीच सांगितलंय की आम्ही सतर्क आहोत. वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. सरकारच्या कामकाजावर आमचं लक्ष आहे. तुम्हीच त्यांना मतदान केलं आहे. काय चाललंय हे पाहिलं पाहिजे आणि जे काही चाललंय ते व्यवस्थित आहे का? यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आम्हीही लक्ष देऊन आहोतच. जर तामिळनाडूत तमिळ बोलणारा एखादा व्यक्ती राजकीय पक्ष सुरू करत असेल तर माझ्या मते तो एक द्रविड पक्षच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सहा मागण्या

यावेळी कमल हासन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याकडे तमिळ सिनेसृष्टीच्या अनुषंगाने काही मागण्या केल्या आहेत. सरकारी तमिळ ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाला पाहिजे, चार टक्के मनोरंजन कर दूर करावा, पायरेसीच्या विरोधात अँटी पायरेसी टीम बनवली जावी, थिएटरमध्ये सिनेमाला रोज पाच शो मिळाले पाहिजे. थिएटर्स आणि ओटीटीच्या रिलीजमधील अंतर 8 आठवड्याचं असावं आणि फिल्म प्रोडक्शन इन्सेंटिव्ह योजना सुरू कराव्यात, अशा सहा मागण्या त्यांनी विजय यांच्याकडे केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us