
बॉलिवूड चित्रपटांमधील हिट गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सचिन-जिगर या संगीतकारांच्या जोडगोळीपैकी सचिन सांघवीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 29 वर्षीय गायिकेनं सचिनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर सचिनला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. परंतु नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. सचिनने लग्न करण्याचं आणि म्युझिक अल्बममध्ये संधी देण्याचं आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. इतकंच नव्हे तर 2024 मध्ये त्याने बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचंही तिने म्हटलंय. परंतु सचिनच्या वकिलांनी त्याच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत. सचिन विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.
“सचिन सांघवीवर एफआयआरमध्ये लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. या प्रकरणात दमच नाही. पोलिसांनी केलेली अटकसुद्धा बेकायदेशीर आहे. म्हणूनच त्याला लगेच जामिन मिळाला. आम्ही सर्व आरोपांना पूर्णपणे आणि स्पष्टपणे फेटाळत आहोत”, अशी प्रतिक्रिया सचिनच्या वकिलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. सचिनविरोधात भारतीय दंडसंहितेच्या (बीएनएस) कलम 69 आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिनचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा सध्या डिअॅक्टिव्हेट आहे. त्याने शनिवारी सकाळपर्यंत त्याच्याविरोधातील आरोपांवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेनं दावा केला की सचिनशी तिची भेट फेब्रुवारी 2024 मध्ये सोशल मीडियाद्वारे झाली होती. त्यानंतर कामाबद्दल चर्चा करण्यासाठी दोघं अनेकदा भेटले. सचिनने एका म्युझिक अल्बममध्ये गाण्याची संधी देण्याची ऑफर दिली होती, असं तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर शारीरिक संबंधाच्या बदल्यात लग्नाचंही आमिष दाखवलं होतं, असा दावा महिलेनं केला. 2024 मध्ये संबंधित महिला गरोदर होती आणि सचिनने बळजबरी केल्याने गर्भपात केल्याचाही आरोप तिने केला.
सचिन-जिगर ही जोडगोळी बॉलिवूड इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. यापैकी सचिन सांघवीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांना संगीतबद्ध केलंय. यामध्ये ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘परमसुंदरी’ या चित्रपटांचा समावेश आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘थमा’ या चित्रपटातील गाण्यांनाही त्याने संगीत दिलंय.