सुरक्षारक्षक ढाराढूर झोपले अन् आरोपी इमारतीत घुसला; तर करीनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपी निसटला; पोलीस तपासात मोठी माहिती

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. करीना आणि सुरक्षारक्षकांच्या हलगर्जीपणामुळे त्या चोराला निसटून जाण्याची संधी मिळाली असा दावा पोलिसांनी केला. अन्यथा तो आरोपी त्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात असता. नेमकी काय करीना आणि सुरक्षारक्षकांकडून अशी काय चूक घडली?

सुरक्षारक्षक ढाराढूर झोपले अन् आरोपी इमारतीत घुसला; तर करीनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपी निसटला; पोलीस तपासात मोठी माहिती
| Updated on: Jan 21, 2025 | 5:32 PM

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेनंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर योग्य ते उपचार झाल्यानं त्याची प्रकृती आता ठिक आहे. तसेच पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

आरोपीची कसून चौकशीही करण्यात येत आहे. पण याच तपासात एक अजून महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे आरोपीला पळून जाण्यासाठी संधी मिळाली त्यात सुरक्षारक्षकांची तर चूक आहेच पण करीनाचीही एक छोटी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

करीनाच्या त्या चुकीमुळे वेळ गेल्याचा पोलिसांचा दावा

सैफवर हल्ला झाला तेव्हा अभिनेत्री करीना कपूरने मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता अशी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या चोराने चाकूने हल्ला केला. यानंतर या सगळ्या प्रकराची माहिती करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, करिनाला यावर त्या पोलिसाचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

सैफ अली खानला जेव्हा लिलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं त्यावेळेस लिलावती रुग्णालयाकडून पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलीस लिलावती रुग्णालय आणि सैफ अली खानच्या घरी तपासासाठी रवाना झाले. मात्र करिना कपूरने केलेल्या त्या चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

CCTV नाही,  दोन्ही सुरक्षारक्षक निवांत झोपले होते

सैफ अली खान राहत असलेल्या ‘सदगुरू शरण’ इमारतीच्या कॉरिडॉर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच सर्वात मोठी चूक म्हणजे सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा फारच गंभीर स्वरुपाचा असल्याचं समोर आलं आहे. कारण या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एक जण केबिनमध्ये तर दुसरा गेटवर झोपला असल्याचं तपासात उघड झालं आहे.

त्यामुळेच आरोपी हा 10 व्या मजल्यापर्यंत शिड्यांनी तर अकरावा मजला डक परिसरातून पाईपने चढला. आवाज होऊ नये म्हणून आरोपीने स्वतःचे बूट बॅगमध्ये ठेवले होते.तसेच त्याने पळताना कपडे बदलले आणि स्वतःचा फोन बंद ठेवला होता.

करिनाकडून कोणती चूक घडली?

करिनाने आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन हल्ल्याची माहिती दिली. मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. अखेर रुग्णालयात सैफला दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती मिळाली. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 20 ते 25 मिनिटे गेल्याने आरोपीला पळून जाण्यास तितका वेळ मिळाला.

जर हल्ला होताच करिनाने पोलिस अधिकाऱ्याऐवजी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन घटनास्थळावर दाखल झाली असती अन् आरोपी लगेचच ताब्यात आला असता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

हल्ल्याचे पोलीस रिक्रिएशन

आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने घेतलेली सर्व खबरदारी पाहता आरोपी बांगलादेशमध्येही सराईत गुन्हेगार असावा, असा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आरोपी शरीफुलला पुन्हा ‘सदगुरू शरण’ इमारतीमध्ये नेऊन सैफवर केलेल्या हल्ल्याचे पोलिस रिक्रिएशन 21 जानेवारीच्या पहाटे करण्यात आलं. त्यामधूनही बरीच माहिती उघड होईल, असे तपास अधिकारी म्हणाले आहेत.