ना सौंदर्य, ना बुद्धिमत्ता… 1951 मध्ये फक्त बिकिनीवर ठरली पहिली मिस वर्ल्ड; असा बदलला संपूर्ण कॉन्सेप्ट!

1951 मध्ये मिस वर्ल्ड या स्पर्धेला सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त बिकिनी परिधान करुन प्रेक्षकांसमोर येण्यास सांगण्यात यायचे. पण नंतर पूर्ण कॉन्सेप्ट बदलली.

ना सौंदर्य, ना बुद्धिमत्ता… 1951 मध्ये फक्त बिकिनीवर ठरली पहिली मिस वर्ल्ड; असा बदलला संपूर्ण कॉन्सेप्ट!
Miss World first
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2025 | 2:25 PM

74 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेची सुरुवात झाली आणि तेव्हापासून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. जगभरातील अनेक देशांमधील स्पर्धक यात सहभागी होतात. यंदा भारतातील हैदराबाद येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्याचा अंतिम सोहळा आज, 31 मे 2025 रोजी होणार आहे. भारताने आतापर्यंत 6 मिस वर्ल्ड विजेत्या दिल्या आहेत, यापैकी पहिला किताब 1966 मध्ये मिळाला होता. पण, 1951 मध्ये या स्पर्धेची सुरुवात एका मोठ्या उत्सवाचा छोटासा भाग म्हणून झाली होती.

1951 मधील बिकिनी स्पर्धा

1951 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात झाली, तेव्हा तिला ‘फेस्टिवल बिकिनी कॉन्टेस्ट’ असे नाव देण्यात आले होते. ही स्पर्धा मुख्य कार्यक्रम नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतर देशाच्या पुनर्निर्माणासाठी ब्रिटनमध्ये ‘फेस्टिवल ऑफ ब्रिटेन’ नावाचा ग्रीष्मकालीन उत्सव आयोजित केला होता. या उत्सवात जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्य स्पर्धेचा समावेश करण्यात आला. ही कल्पना लंडनस्थित एका मनोरंजन कंपनीच्या प्रचार संचालकाने सुचवली होती.

कोण होत्या पहिल्या मिस वर्ल्ड?

ज्या वेळी ही स्पर्धा सुरू झाली, तेव्हा बिकिनी हा नवीन संकल्पना होती. या स्पर्धेत बिकिनीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धकांना बिकिनी परिधान करणे बंधनकारक होते. स्वीडनच्या किकी हाकनसन यांनी या पहिल्या स्पर्धेत विजय मिळवला. या स्पर्धेत फक्त बिकिनी परिधान करून प्रेक्षकांसमोर येणे एवढेच अपेक्षित होते. ही स्पर्धा फक्त त्या वर्षापुरती आयोजित करण्यात आली होती, पण लोकांनी तिचे इतके कौतुक केले की ती दरवर्षी आयोजित होऊ लागली. नंतर या स्पर्धेला ‘मिस वर्ल्ड’ असे नाव देण्यात आले.

बिकिनीवर बंदी

मात्र, या स्पर्धेला अनेक देशांनी बिकिनीमुळे विरोध दर्शवला. आयर्लंड आणि स्पेनसारख्या देशांनी महिलांचे मूल्यमापन फक्त बिकिनीवर करणे चुकीचे आहे, असे म्हणत सहभाग नाकारला. या विरोधानंतर स्पर्धेत बिकिनीवर बंदी घालण्यात आली आणि त्याऐवजी वन-पीस बाथसूट आणण्यात आले. अशा प्रकारे किकी हाकनसन पहिल्या मिस वर्ल्ड बनल्या आणि त्या एकमेव मिस वर्ल्ड ठरल्या ज्यांनी बिकिनी परिधान केली होती.