या मालिकेची इतकी क्रेझ की मुलं शाळेत जात नव्हते, पाहण्यासाठी घरात व्हायची गर्दी
दूरदर्शनवरील एक अशी मालिका जिने 8 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य. इतकी सुपरहिट की मुलं शाळेत जात नव्हते. शेवटी मालिकेच्या वेळेत करण्यात आला होता बदल.

90 च्या दशकात बॉलिवूडच्या चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरील मालिकांचाही प्रेक्षकांमध्ये मोठा चाहतावर्ग होता. अनेक लोक तर सकाळी लवकर काम करून दुपारी मालिका बघण्यासाठी आधीच टीव्ही चालू करून बसायचे. अशीच एक मालिका जिच्यासाठी जिला पाहण्यासाठी अनेक मुलं शाळा देखील बुडवायचे. कोणती आहे ती मालिका? जाणून घेऊयात सविस्तर
त्या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘शक्तिमान’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं होतं. अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही अनेकांच्या आठवणींमध्ये कायम आहे. विशेष म्हणजे, या मालिकेची लोकप्रियता इतकी होती की, ती पाहण्यासाठी मुलं शाळाही बुडवत असल्याचं सांगितलं जातं.
‘शक्तिमान’ची देशभरात होती जबरदस्त क्रेझ
1997 मध्ये सुरू झालेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेने लहान मुलांसह मोठ्यांनाही भुरळ घातली होती. सुरुवातीला शनिवारी दुपारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेची वेळ झाली की, अनेक जण टीव्हीसमोर बसत असत. शक्तिमानच्या साहसी कथा, त्याची अनोखी शक्ती आणि वाईट शक्तींविरुद्धचा संघर्ष यामुळे ही मालिका घराघरांत लोकप्रिय झाली.
मुलांसाठी बदलण्यात आली होती वेळ?
‘शक्तिमान’ पाहण्यासाठी मुलांमध्ये विशेष उत्सुकता होती. मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत शाळा असल्यामुळे काही मुलं ती पाहण्यासाठी शाळा बुडवत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मालिकेच्या प्रसारणाची वेळ शनिवारी ऐवजी रविवारी दुपारी करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या बदलामुळे मुलांना सुट्टीच्या दिवशी आपल्या आवडत्या सुपरहिरोची मालिका पाहता येऊ लागली.
2005 पर्यंत सुरू होता मालिकेचा प्रवास
‘शक्तिमान’ ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली. या मालिकेत सुमारे 400 भाग दाखवण्यात आले होते. मालिकेचं दिग्दर्शन दिनकर जानी यांनी केलं होतं. मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तिमानची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय भूमिकांपैकी एक ठरली.
आजही ‘शक्तिमान’चा उल्लेख झाला की 90 च्या दशकातील प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. मनोरंजनासोबतच सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा आणि वाईट गोष्टींविरुद्ध उभं राहण्याचा संदेश देणाऱ्या या मालिकेने भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.