
Marathi Song : मराठी इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. यामध्ये अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ज्यामध्ये नागराज मंजुळे यांच्या देखील चित्रपटाचा समावेश आहे. ज्याची कथा आणि त्यामधील गाणं ही प्रचंड चर्चेत आली होती. आजही या चित्रपटातील गाणी लागली की कोणताही तरुण डान्स करायला तयार होतो.
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्या चित्रपटाचे नाव ‘फँड्री’ आहे. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील 5 मिनिटे 11 सेकंदाचं ‘तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला’ हे गाणं. अनेक वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. हे गाणं सुरू होताच आजही लाखो चाहते थिरकायला लागतात.
या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला जब्या म्हणजेच अभिनेता सोमनाथ अवघडे आता मात्र खूपच बदललेला दिसतो आहे. या चित्रपटातील त्याचा लूक आणि त्याची भूमिका आणि त्याच्या हलगीवर नाचणारे लोक हे पाहून अनेकांना त्याची ही भूमिका प्रचंड आवडली होती. त्याच्या हलगीवर नाचणारे नागराज मंजुळे यांचा डान्स देखील सोशल मीडियावर चर्चेत आला होता. त्यामुळे सोमनाथ अवघडेला त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली.
सोमनाथ अवघडेचा बदलला लूक
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोमनाथ अवघडे एका रात्रीत स्टार झाला. मात्र, या प्रसिद्धीने भारावून न जाता त्याने आपलं आयुष्य अत्यंत साधेपणाने पुढे नेलं. बालकलाकार म्हणून मिळालेल्या यशानंतरही त्याने शिक्षणाला प्राधान्य दिलं. सध्या त्याच्या लूकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्याच्या अलीकडच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये जब्याचा निरागस चेहरा आता आत्मविश्वासू तरुणामध्ये बदललेला दिसतो आहे.
सोमनाथ अवघडेची ‘फँड्री’मधील भूमिका ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लक्षात राहणारी भूमिका ठरली. आजही त्याची ओळख ‘जब्या’ म्हणूनच केली जाते. सोशल मीडियावर जेव्हा जेव्हा ‘तुझ्या प्रितीचा विंचू’ हे गाणं ट्रेंड होतं तेव्हा प्रेक्षक आवर्जून सोमनाथ अवघडेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
एकीकडे सोशल मीडियावर गाणं पुन्हा चर्चेत असताना दुसरीकडे जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे हा पुढे कोणत्या चित्रपटात दिसणार याबद्दल आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.