दिलजीत दोसांझच्या इंदूर कॉन्सर्टमध्ये या 5 गाण्यांवर बंदी? प्रशासनाचा आयोजकांना इशारा, नेमकं कारण काय?

दिलजीत दोसांझच्या इंदूरमधील कॉन्सर्टच्या कार्यक्रमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या या 5 गाण्यावर बंदी घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. नेमकं हरियाणा हायकोर्टाने काय म्हटलं?

दिलजीत दोसांझच्या इंदूर कॉन्सर्टमध्ये या 5 गाण्यांवर बंदी? प्रशासनाचा आयोजकांना इशारा, नेमकं कारण काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 07, 2026 | 8:26 PM

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या आपल्या ‘ऑरो टूर’मुळे चर्चेत आहे. या टूरची सुरुवात 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीमधून झाली. आता 15 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच प्रशासनाने काही गाण्यांबाबत आक्षेप घेतला आहे. ड्रग्ज, नशा आणि शस्त्रांचे उदात्तीकरण करणारी पाच गाणी कॉन्सर्टमध्ये सादर करू नयेत, अशी सूचना आयोजकांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील कॉन्सर्टसंदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी 21 मॉलच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात दिलजीत दोसांझने कार्यक्रमादरम्यान काही विशिष्ट गाणी सादर करू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यामध्ये ‘जट उठे फायर करदा’, ‘पटियाला पेग’, ‘जीभ विच लंबिया’ यांसह एकूण पाच गाण्यांचा उल्लेख आहे. या गाण्यांमधून नशा आणि शस्त्रांचे उदात्तीकरण होत असल्याने त्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

Loading...

पंजाब-हरियाणा हायकोर्टाच्या निर्देशांचा हवाला

या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या निर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ड्रग्ज, नशेचे सेवन आणि शस्त्रांचे महिमामंडन करणाऱ्या गाण्यांबाबत न्यायालयाने व्यक्त केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर इंदूर प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश राय यांनी कॉन्सर्ट आयोजकांना पत्र पाठवून संबंधित निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. हे पत्र सुमारे 5 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आल्याची माहिती आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा

कॉन्सर्टदरम्यान आक्षेपार्ह गाणी सादर झाल्यास कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिलजीतच्या इंदूर कॉन्सर्टवर प्रशासनाची विशेष नजर असणार आहे.

कॉन्सर्ट रद्द होणार नसल्याचे दिलजीतने केले स्पष्ट

दरम्यान, इंदूरमधील हा कार्यक्रम रद्द झाल्याच्या बातम्या यापूर्वी समोर आल्या होत्या. मात्र, दिलजीत दोसांझने स्वतः कॉन्सर्ट रद्द केला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता कार्यक्रमातील गाण्यांच्या निवडीवरून चर्चा सुरू झाली आहे. दिलजीतच्या चाहत्यांना 15 नोव्हेंबरच्या कॉन्सर्टमध्ये कोणती गाणी ऐकायला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us