‘छावा’च्या निर्मात्यांकडून 36 कोटींचा घोटाळा? बॉलिवूड अभिनेत्याकडून प्रश्न उपस्थित

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत तब्बल 121.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र या कमाईच्या आकड्यावरून एका अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे.

छावाच्या निर्मात्यांकडून 36 कोटींचा घोटाळा? बॉलिवूड अभिनेत्याकडून प्रश्न उपस्थित
Vicky Kaushal
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2025 | 9:09 AM

सध्या सोशल मीडिया आणि बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा आहे.. तो म्हणजे ‘छावा’. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनुसार ‘छावा’ने अवघ्या तीन दिवसांत तब्बल 121.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. तर त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कमाईची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असतानाच आता एका अभिनेत्याने त्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल राशिद खान ऊर्फ केआरके आहे. केआरकेनं एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित कलेक्शनचं गणित सांगितलं आहे.

केआरकेच्या ट्विटनुसार ‘छावा’च्या निर्मात्यांनी चित्रपटांची कमाई वाढवून सांगितली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने फक्त 85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे, मात्र निर्मात्यांनी त्यात 36 कोटी रुपये वाढवून सांगितले आहेत, असा दावा त्याने केला आहे. केआरकेच्या मते पीव्हीआर आणि आयनॉक्सद्वारे या चित्रपटाने 36 कोटी 64 लाख 20 हजार 42 रुपये (13.60 लाख तिकिटं) कमावले आहेत. तर सिनेपॉलिसद्वारे या चित्रपटाच्या खात्यात 10 कोटी 15 लाख 88 हजार 618 रुपये (3.27 लाख तिकिटं) जमा झाले आहेत. म्हणजेच एकूण 49 कोटी 80 लाख 8 हजार 660 रुपये होतात. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये पुढे आणखी काही मल्टिप्लेक्सच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.

    • मिराज सिनेमा चेन- 5 कोटी 77 लाख (2.59 लाख तिकिटं)
    • मूव्ही मॅक्स चेन- 4 कोटी 45 लाख 43 हजार 253 रुपये (1.52 लाख तिकिटं)

केआरकेनं पुढे लिहिलंय की, या चित्रपटाला 5 सिनेमा चेनमध्ये 21 लाख 70 लोकांना पाहिलंय. त्यातून 60 कोटी 2 लाख 51 हजरा 913 रुपयांची कमाई झाली आहे. याशिवाय चित्रपटाने दुसऱ्या थिएटर्समधून 25 कोटी रुपयांची कमाई केली असेल. म्हणजेच एकूण जवळपास 85 कोटी रुपयांची कमाई होते. मात्र ‘छावा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 121 कोटी रुपये सांगितला आहे. त्यामुळे 121 कोटी रुपयांमधून 85 कोटी रुपये वजा केले तर 36 कोटी रुपये शिल्लक राहतात. ‘तर मग हे 36 कोटी रुपये कुठून आले? मंगळावरून, चंद्रावरून, गुरू ग्रहावरून की सूर्यावरून?’, असा उपरोधिक सवाल केआरकेनं केला आहे.