
‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिच्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार पाहिले. या वर्षी एप्रिल महिन्यात तिचा पूर्व पती पियुष पुरेचं निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी त्याच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पियुषच्या दारुच्या व्यसनाचा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर आणि कुटुंबावर कशा पद्धतीने परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. “मला लग्नानंतर पियुषच्या व्यसनाविषयी समजलं. त्याला कॉलेजपासूनच दारुचं व्यसन होतं, परंतु नंतर ते अधिकच वाढत गेलं. आमचं नातं वाचवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. आम्ही 17 वर्षे सोबत होतो”, असं ती म्हणाली.
“मी माझ्या कामात व्यस्त असल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीवच मला नव्हती. माझी मुलगी आशी मला पियुषच्या सवयींबद्दल सांगायची. दारु प्यायल्यानंतर तो खूप चिडचिड करायचा, असं तिने सांगितलं होतं. परंतु कोविडदरम्यान मला खरी परिस्थिती समजली. घरी असताना मी माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही पाहत होते आणि अनुभवत होते”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. 2018 मध्ये पियुषने हेअर ट्रान्सप्लांटची ट्रिटमेंट सुरू केली होती. त्यासाठी तो स्टेरॉइड्स घेत होता. स्टेरॉइड्ससोबत दारु प्यायल्याने त्याच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला.
“हेअर ट्रान्सप्लांट ट्रिटमेंटसाठी त्याला स्टेरॉइड्स घ्यावे लागत होते. परंतु दारुचं व्यसन असल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. अखेर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्याला व्यसनाबद्दल बजावलं होतं. व्यसनमुक्ती केंद्र आणि कुटुंबीयांसोबत चर्चा.. असे सर्व उपाय केल्यानंतरही काही फरक पडला नाही. अखेर मी माझ्या आणि मुलीच्या मानसिक आरोग्याखातर घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही मी त्याची आर्थिक मदत करत होती. पण तरीसुद्धा त्याचं व्यसन काही सुटलं नाही”, असा खुलासा शुभांगीने केला.
पियुष पुरेच्या निधनाच्या दोन दिवसांपूर्वी शुभांगीने त्याची भेट घेतली होती. तेव्हासुद्धा त्याला व्यसन सोडण्याबद्दल आणि आरोग्य सुधारण्याबद्दल विनंती केल्याचं तिने सांगितलं. “मी रडत होते आणि त्याला सांगत होते की कृपया तू बरा हो. अवयव निकामी झाल्याने त्याच्यावर ही अवस्था झाली होती आणि त्यासाठी दारुच दोषी होतं”, अशा शब्दांत शुभांगीने भावना व्यक्त केल्या.