
फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना करिअरमध्ये प्रचंड यश मिळालं. परंतु खासगी आयुष्यात त्यांनी एकटेपणाचा आणि बऱ्याच समस्यांचा सामना केला. असाच एक अभिनेता चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रेल्वे तिकिट कलेक्टरचं काम करत होता. फिल्म इंडस्ट्रीत या अभिनेत्याला खूप यश मिळालं. जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रचंड पैसा कमावला. परंतु त्या पैशांचा वारसदार असतानाही त्यांनी आपली सर्व संपत्ती आणि जमापुंजी मोलकरीणीच्या नावावर केली. इतकंच नव्हे तर बराच त्रास सहन करून त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. या अभिनेत्याचं नाव आहे रंगनाथ.
रंगनाथ हे तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. रंगनाथ यांचं खरं नाव तिरुमाला सुंदर श्री रंगनाथ असं होतं. त्यांनी भारतीय रेल्वेमधून करिअरची सुरुवात केली होती. परंतु लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड असल्याने त्यांनी रेल्वेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 1974 मध्ये त्यांचा ‘चंदना’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. सत्तरच्या दशकातील ते लोकप्रिय अभिनेते ठरले होते. त्यांनी ‘मनमधुदु’, ‘निजाम’, ‘अडवी रामुडु’, ‘देवराय’ आणि ‘गोपाला गोपाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. रंगनाथ यांनी मालिकांमध्येही काम केलं होतं.
रंगनाथ यांनी त्यांच्या करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये त्यांनी हिरो, सहाय्यक अभिनेत्यापासून खलनायकापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. प्रचंड पैसा कमावल्यानंतरही ते त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र खुश नव्हते. त्यांची पत्नी चैतन्या यांचा भीषण अपघात झाला होता. जवळपास 15 वर्षे पत्नीची सेवा केल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती. यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं होतं.
अखेर 2009 मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर रंगनाथ पूर्णपणे एकटे पडले. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला. रंगनाथ यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. परंतु पत्नीला गमावल्याचं दु:ख ते सहन करू शकले नाहीत. 2015 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. घरातील किचनच्या एका कप्प्यात ही चिठ्ठी सापडली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘मिनाक्षी बँक (एबी) डिपॉझिट, बाँड्स ब्युरोमध्ये आहेत, तिला देऊन टाका. तिला त्रास देऊ नका.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या निधनानंतर रंगनाथ घरात एकटेच राहायचे आणि मिनाक्षी त्यांची देखभाल करायची. मिनाक्षी त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण होती. एका मुलाखतीत रंगनाथ यांचा मुलगा नागेंद्र कुमारने सांगितलं होतं की, मिनाक्षीने बरीच वर्षे त्याच्या आईवडिलांची सेवा केली होती. ते सर्वजण मिनाक्षीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यच मानायचे.