टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठी कडी! अनिल पंडितच्या परदेशी नेटवर्कपर्यंत पोहोचवणारा दुवा सापडला; नवा ट्विस्ट काय?
Tiger Shroff Attack Case Update: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात प्रांजल ठकराल महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे फरार अनिल पंडितपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सोपे होणार आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी इंदूरमध्ये एका २२ वर्षीय इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सुरतमधून दोन शस्त्रे जप्त केली आहेत, ज्यांचा वापर या घटनेत झाल्याचा आरोप आहे. आता टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात एक महत्वाची कडी हाती लागली आहे. मुख्य सूत्रधार अनिल पंडित आणि प्रांजलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार अनिल पंडितचा खास प्रांजल ठकराल आहे. त्याने ‘डिप्लोमा इन इंजिनिअर’ची डिग्री घेतली आहे. त्याच्याबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा संपूर्ण कट अनिल पंडितने रचला होता. तर तो प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रांजल ठकराल हा त्याचा एक महत्वाचा दुआ होता. अनिल आणि प्रांजल हे दोघे रोज एका विशिष्ट सिक्रेट ॲपच्या माध्यमातून संपर्कात होते. जेणेकरून पोलिसांना त्यांचे लोकेशन ट्रेस करता येऊ नये.
या कटासाठी लागणारा पैसा, शूटर्सना मदत, लॉजिस्टिक सगळी जबाबदारी प्रांजलवर होती. प्रांजलचा गुन्हेगारी इतिहासही मोठा आहे. यापूर्वी पानिपतमध्ये एका बड्या व्यावसायिकावर झालेल्या फायरिंगचाही कट अनिल पंडितच्या सांगण्यावरून रेहान अन्सारी आणि प्रांजलनेच रचला होता. त्या प्रकरणात प्रांजलला मार्च महिन्यात जामीन मिळाला. जेलबाहेर येताच त्याने पुन्हा अनिल पंडितसोबत पुन्हा कट रचत थेट मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ल्याचे प्लॅनिंग सुरू केले.
आता क्राईम ब्रँचसाठी प्रांजल ही सर्वात महत्त्वाची कडी ठरला आहे. कारण सध्या परदेशात फरार असलेल्या मुख्य आरोपी अनिल पंडितपर्यंत पोहोचण्यासाठी प्रांजल हा एकमेव दुवा आहे. त्याच्या फोनमधील त्या गुप्त ॲपच्या चॅटमधून आणि पैशांच्या व्यवहारातून अनिल पंडितचे परदेशातील नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. प्रांजलच्या अटकेने आता टायगर श्रॉफ प्रकरणाचा तपास थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार हे नक्की.
प्रांजलला आज न्यायालयात हजर केले तेव्हा त्याला ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळचा हरियाणातील सोनीपतचा रहिवासी असलेला प्रांजल ठकराल आपल्या अर्धांगवायू झालेल्या भावाच्या उपचारासाठी पाच दिवसांपूर्वी इंदूरला आला होता. त्याने या हल्ल्यातील हल्लेखोरांना आणि मुख्य सूत्रधारांना रसद, आर्थिक किंवा इतर प्रकारची मदत पुरवली.