‘टायटॅनिक’मध्ये रोझला वाचवणाऱ्या दरवाज्याचा लिलाव तब्बल इतक्या कोटींना

| Updated on: Mar 27, 2024 | 11:33 AM

'टायटॅनिक' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 25 वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी त्यातील दृश्ये आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. या चित्रपटात ज्या लाकडी दरवाज्यावर तरंगून रोझचे प्राण वाचतात, त्याचा नुकताच लिलाव करण्यात आला.

टायटॅनिकमध्ये रोझला वाचवणाऱ्या दरवाज्याचा लिलाव तब्बल इतक्या कोटींना
लिओनार्डो डिकेप्रियो, केट विंस्लेट
Image Credit source: Twitter
Follow us on

‘टायटॅनिक’ या चित्रपटाला 25 वर्षांहून अधिक काळ झाला असून आजही तो अनेकांचा आवडता चित्रपट आहे. काहींना या चित्रपटातील लव्ह-स्टोरी आवडली तर काहींना हृदय पिळवटून टाकणारा अंत आवडला. यातील सीन्स, डायलॉग्स आजही अनेकांच्या तोंडपाठ आहेत. जेम्स कॅमरून यांच्या अप्रतिम सिनेमॅटोग्राफीचं प्रेक्षक कौतुक तर करतातच पण त्याचसोबत लिओनार्डो डिकेप्रियो आणि केट विंस्लेट यांच्या दमदार अभिनयाचेही असंख्य चाहते आहेत. चित्रपटातील या दोघांच्या लव्ह-स्टोरीमधील एक दरवाजा नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. पाण्यावर तरंगणाऱ्या या दरवाज्यामुळे केटने साकारलेल्या रोझचे प्राण वाचले होते. आता या दरवाज्याचा लिलाव करण्यात आला आहे. चित्रपटात ज्या दरवाज्यामुळे रोझचे प्राण वाचले, तोच जॅकच्या दु:खद निधनाचं कारण ठरला होता.

‘टायटॅनिक’मधील दरवाजा आणि केटच्या ड्रेसचा लिलाव

‘द हॉलिवूड रिपोर्टर’नुसार त्या दरवाजाचा लिलाव तब्बल 718,750 डॉलर्सना (5 कोटी 98 लाखांहून अधिक रुपये) झाला आहे. याशिवाय केट विंस्लेटने जो ड्रेस परिधान केला होता, त्याचाही लिलाव 125,000 डॉलर्सना (1 कोटी 4 लाखांहून अधिक रुपये) झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना तो दरवाजा म्हणजे केवळ लाकडाचा एक पॅनल वाटला होता. मात्र हेरिटेज ऑक्शन्स ट्रेजर्सने स्पष्ट केलं की वास्तवात तो जहाजाच्या फर्स्ट क्लास लाऊंजच्या एंट्रान्सच्या वरील दरवाच्या फ्रेमचा भाग होता. ‘टायटॅनिक’ या चित्रपटात केटने जो शिफॉनचा ड्रेस परिधान केला होता, त्याचाही लिलाव झाला आहे.

चित्रपटाच्या ‘त्या’ सीनवरून वाद

‘टायटॅनिक’मधील ज्या दरवाज्याचा लिलाव पार पडला, त्यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. जॅकचे प्राण वाचू शकले असते, असं मत असंख्य चाहत्यांनी मांडलं होतं. इतकंच नव्हे तर विविध मुलाखतींमध्ये चित्रपटातील कलाकारांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. पाण्यावर तरंगणाऱ्या त्या दरवाज्यावर रोझसोबत जॅकसुद्धा मावू शकला असता आणि दोघांचे प्राण वाचू शकले असते, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. यावरून दिग्दर्शकांनाही आपली बाजू मांडावी लागली होती. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांच्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी जेम्स कॅमरून यांनी चक्क प्रयोगसुद्धा करून पाहिला होता.

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शकांनी केला प्रयोग

2023 मध्ये ‘टायटॅनिक’ला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जेम्स यांनी नॅशनल जिओग्राफिक स्पेशलसाठी एक वैज्ञानिक प्रयोग करून पाहिला होता. जरी जॅक रोझसोबत त्या दरवाज्यावर मावू शकला असता तरी दोघांच्या वजनासोबत ते लाकूड पाण्यात फार काळ तरंगणं कठीण होतं. या प्रयोगासाठी जॅकने केट आणि लिओनार्डो यांच्या शरीराच्या वजनाइतक्याच दोन लोकांना बोलावलं. या प्रयोगाविषयी त्यांनी सांगितलं, “आम्ही त्या सर्वांवर आणि त्यांच्या आत सेन्सर लावले होते. त्यांना बर्फाच्या पाण्यात ठेवलं होतं आणि विविध मार्गांनी त्यांचे प्राण वाचू शकले असते का हे तपासून पाहिलं. पण याचं उत्तर हेच होतं की दोघंही वाचू शकले नसते. एकच व्यक्ती त्यात वाचू शकली असती. जॅकच्या वाचण्याची शक्यता ही केवळ उपलब्ध जागेवरच नाही तर त्या दरवाजाच्या क्षमतेवरही अवलंबून होती.”