
बॉलिवूड चित्रपट त्यातील गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. एखादा चित्रपट हिट होण्यामागे त्यातील गाणीसुद्धा कारणीभूत असतात. नव्वदच्या दशकात अशाच एका चित्रपटातील गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्याने रेडिओवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. परंतु याच गाण्यामुळे देशभरात अनेकांना अटकसुद्धा झाली होती. एखाद्या गाण्यामुळे कोणाला अटक होऊ शकते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु प्रत्यक्षात असं घडलं होतं. हे गाणं कोणतं होतं आणि त्यामुळे लोकांना का अटक झाली होती, ते जाणून घेऊयात..
दिग्दर्शक राजीव रायने ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, “नव्वदच्या दशकात एका चित्रपटातील गाण्यावर बंदी तर लावण्यात आली नव्हती, परंतु ते गाणं बदनाम नक्की झालं होतं. यामागचं कारण खरंतर चकीत करणारं आहे. संपूर्ण देशात या गाण्याचा वापर अनेकजण छेडछाडीसाठी करू लागले होते. अशा अनेक घटना समोर आल्या होत्या. छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना अटक झाली होती. या गाण्याचा वापर करून मुलींना छेडलं जात होतं. परंतु त्यामुळे गाण्यावर बंदी आणली नव्हती.” 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘त्रिदेव’ या चित्रपटातील हे गाणं होतं. यातील ‘ओए ओए’ हे गाणं चार्टबस्टरवर पहिल्या क्रमांकावर होतं.
‘त्रिदेव’ चित्रपटातील ‘ओए ओए’ या गाण्याची प्रेरणा ग्लोरिया एस्टफेनच्या ‘रिदम इज गोना गेट यू’ या हिट गाण्यापासून घेण्यात आली होती. कल्याणजी-आनंदजी या दिग्गज जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. तर कविता कृष्णमूर्त आणि सुरेश वाडकर यांनी गायलं होतं. त्रिदेव या चित्रपटात सोनम, सनी देओल, जॅकी श्रॉफ, नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका होत्या.
1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘त्रिदेव’ हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन थ्रिलर होता. राजीव राय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये नसीरुद्दीन शाह, सनी देओल, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीत बिजलानी, सोनम, अनुपम खेर आणि अमरीश पुरी अशी कलाकारांची मोठी फौजच होती. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावर्षी हा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरला होता. ‘मैंने प्यार किया’ आणि ‘राम लखन’ हे दोन चित्रपट त्यापुढे होते. 1990 मध्ये पार पडलेल्या 35 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले होते.