Tunisha Case: शिझानच्या बहिणीने सांगितलं तुनिशाच्या हिजाबमागचं सत्य; दर्ग्यात घेऊन जाण्याबद्दलही केला खुलासा

तुनिशा आत्महत्येप्रकरणी शिझानच्या बहिणीचे आईवर आरोप; हिजाब, दर्ग्याच्या आरोपांवर केला प्रतिप्रश्न

Tunisha Case: शिझानच्या बहिणीने सांगितलं तुनिशाच्या हिजाबमागचं सत्य; दर्ग्यात घेऊन जाण्याबद्दलही केला खुलासा
Tunisha Case: शिझानच्या बहिणीने सांगितलं तुनिशाच्या हिजाबमागचं सत्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2023 | 12:50 PM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. तुनिशाची आई वनिता शर्मा आणि मामा यांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात दोघांनी अभिनेता शिझान खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. शिझानच्या बहिणीने तुनिशाला दर्ग्यात नेलं होतं आणि हिजाब परिधान करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता, असे आरोप वनिता शर्मा यांनी केले होते. त्यावर आता शिझानच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिझानची बहीण फलक आणि शफक नाज यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे.

तुनिशाचे तिच्या आईसोबत चांगले संबंध नव्हते आणि तिच्या पैशांवर आईचंच नियंत्रण होतं, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला. तुनिशाला बळजबरीने हिजाब परिधान करण्यास सांगितल्याच्या आरोपांवर फलकने सांगितलं की तो तिच्या शूटिंगचा भाग होता. तुनिशा आणि शिझान हे ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या एका सीनदरम्यान तुनिशाने हिजाब परिधान केला होता, असं शिझानच्या बहिणीने स्पष्ट केलं.

तुनिशाला दर्ग्यात घेऊन गेल्याच्या आरोपांवर फलक पुढे म्हणाली, “वनिता जी, मी तुमचा खूप आदर करते. मात्र तुम्ही आमचा खूप अपमान केला. तुम्ही आमच्यावर आरोप केला की आम्ही तुनिशाला घेऊन दर्ग्यात गेलो होतो. तर आता तुम्हीच सांगा की आम्ही कधी गेलो? तुनिशा आणि शिझान यांचं ब्रेकअप बऱ्याच दिवसांपूर्वी झालं होतं. तिने हिजाब का परिधान केला होता, यामागचं कारण तरी समजून घ्या. त्यादिवशी मालिकेत तसा सीन होता, म्हणून तिला हिजाब परिधान करावा लागला होता.”