Ur Trending In My Heart : ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ युट्यूब हिप-हॉपच्या चार्टमध्ये, जेन झींनी गाणं उचलून धरलं
Ur Trending In My Heart : टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांचं 'यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट' हे गाणं युट्यूब हिप-हॉपच्या चार्टमध्ये आलं आहे.

सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या एका गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि स्वतःच्या आवाजात गायलेलं ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ हे गाणं सध्या तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे, ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्यानं लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला असून यूट्यूब आणि इन्स्टाग्राम मिळून या गाण्याचे व्ह्यूज साडे आठ लाखांच्या घरात पोहोचले आहेत. अल्पावधीत मिळालेला हा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
यूट्यूब हिप-हॉप चार्टमध्ये!
‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला केवळ सोशल मीडियावरच नाही, तर संगीतप्रेमींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूट्यूबच्या हिप-हॉप प्लेलिस्टमध्ये या गाण्याने स्थान पटकावलं आहे. त्यामुळे गाण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
नऊ वर्षांपूर्वी सुचलेली कल्पना, आजच्या Gen Z ची आवड!
या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची संकल्पना. जवळपास नऊ वर्षांपूर्वी उमेश कुमावत यांच्या मनात या गाण्याची कल्पना आली होती. मात्र, आजच्या डिजिटल युगात आणि विशेषतः Gen Z पिढीच्या आवडीनिवडींशी या गाण्याचे शब्द आणि संगीत अगदी जुळणारे ठरत आहेत. प्रेमाची भावना आणि सोशल मीडियावर वापरली जाणारी ट्रेंडिंग भाषा यांचा अनोखा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, या गाण्याचं लेखन, संगीत दिग्दर्शन आणि गायन या तिन्ही जबाबदाऱ्या उमेश कुमावत यांनीच सांभाळल्या आहेत. 11 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गाण्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
अनेक म्युझिक प्लॅटफॉर्मवर गाणं उपलब्ध
यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसोबतच हे गाणं Spotify, Apple Music, Amazon Music, Gaana आणि JioSaavn यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर उमेश कुमावत यांच्या या नव्या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ हे गाणं सध्या तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवत असल्याचं चित्र आहे.