IMDb वर 9.2 रेटिंगच्या सुपरहिट वेब सीरिजचा नवीन सिझन; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

ओटीटीवर एका हिट वेब सीरिजचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत आणि कोटा फॅक्ट्री यांसारखे हिट वेब सीरिज बनवलेल्या TVF ने या नव्या सिझनचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाली होती.

IMDb वर 9.2 रेटिंगच्या सुपरहिट वेब सीरिजचा नवीन सिझन; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
sapne vs everyone
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 20, 2026 | 10:56 AM

एस्पिरेंट्स, पंचायत, कोटा फॅक्ट्री, गुल्लक यांसारख्या दमदार वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या TVF ने आता एका गाजलेल्या वेब सीरिजच्या नव्या सिझनची घोषणा केली आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर या सीरिजला 10 पैकी 9.2 रेटिंग मिळाली होती. मोस्ट वॉच्ड सीरिजमध्ये समाविष्ट असलेल्या या वेब सीरिजचा नवीन सिझन लवकरच ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजचं नाव आहे ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ (Sapne vs Everyone). त्याच्या नवीन सिझनचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सर्वांच्या विरोधात जाऊन आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आव्हानांचा सामना करण्याबाबतची या सीरिजची कथा आहे. महत्त्वाकांक्षा, सूड आणि ओळख यांसारख्या विषयांवर ही सीरिज खोलवर जाऊन भाष्य करते.

या नव्या सिझनमध्येही अंबरीश वर्मा, परमवीर सिंह चीमा आणि विजयंता कोहली यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिषेक चौहान, निधी शाह आणि खुशाली कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन सिझन 2’ची कथा मुंबईतील चित्रपटसृष्टी आणि रिअल इस्टेट या दोन वेगवेगळ्या जगांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या नवीन सिझनमध्ये प्रशांत (परमवीर सिंह चीमा) मनोरंजन क्षेत्रात एक अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करताना दिसतो, तर दुसरीकडे ‘सेल्स गॉड’ म्हणून ओळखला जाणारा जिमी (अंबरीश वर्मा) रिअर इस्टेट आणि राजकारणाच्या जगात आणखी खोलवर शिरतो.

सत्तासंघर्ष, नकार आणि अनिश्चिततेनं भरलेल्या या धोकादायक मार्गावर प्रवास करताना या दोघांच्या मनात विचार येतो की नशिब पूर्वनिश्चित असतं की जे स्वत:च्या नशिबाची सूत्रे हातात घेण्याचं धाडस करतात, त्यांच्या हातात ते असतं? दमदार कथानक असलेली ही वेब सीरिज येत्या 1 मे पाहून प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

आयएमडीबीवर उत्तम रेटिंग मिळणं म्हणजे तो चित्रपट किंवा सीरिज दमदार असल्याची पोचपावती. प्रेक्षकांकडूनच ही रेटिंग दिली जाते, त्यामुळे त्यावर कोणत्याही बाहेरील गोष्टींचा प्रभाव नसतो. टीव्हीएफ अत्यंत वेगळे विषय घेऊन विविध सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. त्यापैकीच ही एक सीरिज आहे. या सीरिजच्या टीझरवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया देऊन उत्सुकता व्यक्त केली आहे.

Follow Us