Akshay Kumar: स्वत:ला अनुप जलोटा समजतोस का? अक्षय कुमारला बायकोने सर्वांसमोर सुनावलं
Akshay Kumar: ‘कॉफी विथ करण 9’मध्ये अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला फोन केला आणि तिथेच त्याची चांगलीच पोलखोल झाली. सकाळी 6 वाजता भजनं लावण्यापासून ते बाथरूमचं दार उघडं ठेवण्यापर्यंतच्या सवयी सांगत ट्विंकलने अक्षयची मजेशीर फिरकी घेतली.

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्यातील मजेशीर संवाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. दोघंही एकमेकांची फिरकी घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा या जोडीचा असाच धमाल अंदाज पहायला मिळाला आहे. निमित्त होतं ते करण जोहरच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण’ या शोच्या नवव्या सिझनचं. या शोमध्ये अक्षय कुमार अभिनेता आणि राजकारणी रवी किशनसोबत सहभागी झाला होता. यावेळी एका टास्कदरम्यान अक्षयने पत्नी ट्विंकलला फोन केला. मात्र फोन उचलताच ट्विंकलने अक्षयची अशी काही पोलखोल केली की करण जोहर आणि रवी किशन यांनाही हसू अनावर झालं.
‘सकाळी 6 वाजता कोण भजनं लावतं?’
शोमधील एका मजेशीर टास्कसाठी अक्षयला फोन करून समोरच्या व्यक्तीकडून एक विशिष्ट वाक्य बोलून घ्यायचं होतं. त्यासाठी त्याने ट्विंकलला फोन केला आणि स्पीकरवर ठेवला. मात्र, अक्षयने फोन केल्यावर ट्विंकलने प्रेमाने बोलण्याऐवजी थेट त्याच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. ट्विंकल म्हणाली, “काल रात्री माझी झोप पूर्ण झाली नव्हती. त्यात तू सकाळी लवकर उठवून दिलंस. सकाळी 6 वाजता कोण भजनं लावतं? त्यात तू स्वतः त्याहून मोठ्या आवाजात गात होतास. तू स्वत:ला अनुप जलोट समजतोस का? मी तुला किती वेळा सांगितलंय, निदान बाथरूमचं दार तरी व्यवस्थित बंद करत जा.” ट्विंकलच्या या तक्रारी ऐकून अक्षय काहीसा गोंधळला, तर करण जोहर आणि रवी किशन यांना हसू अनावर झालं.
यानंतर ट्विंकलने अक्षयला तो कुठे आहे, असं विचारलं. त्यावर आपण ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर असल्याचं अक्षयने सांगितलं. विशेष म्हणजे, ट्विंकलने आदल्या दिवशी करण जोहरशी बोलणं झाल्याचं सांगितलं. करणने तिला शोमध्ये रॅपिड फायर राऊंडसाठी परीक्षक म्हणून येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, अक्षय शोमध्ये विनामोबदला सहभागी झाला आहे, हे समजताच तिने आश्चर्य व्यक्त केलं. “तू हे फुकट करतोयस? मला आश्चर्य वाटतंय,” असं ती म्हणाली. यावर करणनेही मजेशीर उत्तर देत, “म्हणजे तुला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे हवे असतात का?” अशी विचारणा केली.
ट्विंकल आणि अक्षयचा हा संवाद सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्यांच्या नात्यातील मैत्रीपूर्ण आणि विनोदी केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.