
काही दिवसांपूर्वीच काही अज्ञात महिला आणि एका मुलाने अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण आता असाच काहीसा प्रकार घडला आहे अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत. त्याच्याही घरात एका अज्ञात महिलेने प्रवेश केला. तो घरी नसताना ती महिला गेली अन् तिने गोंधळ घातला.
नक्की घटना काय?
ही घटना अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील घरी घडली. या संदर्भात अभिनेत्याच्या मोलकरणीने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 26 मे रोजी अभिनेता शूटिंगसाठी बाहेर गेला होता आणि त्याची मोलकरीण घरी एकटी होती. त्या दिवशी, संध्याकाळी 6 वाजता. दाराची बेल वाजली. दार उघडलं असता आदित्यच्या घरात घरकाम करणाऱ्या संगीता पवारने दार उघडलं तेव्हा त्यांच्या समोर एक अनोळखी महिला उभी होती. त्या महिलेने विचारले, “हे आदित्य रॉय कपूरचे घर आहे का?” जेव्हा संगिताने याची पुष्टी केली तेव्हा महिलेने सांगितले की तिला अभिनेत्याला काही भेटवस्तू आणि कपडे द्यायचे आहेत. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संगीताने तिला आत येऊ दिलं. या महिलेने तिचे नाव झकारिया सिद्दीकी अशी करून दिली जी 47 वर्षांची आहे. ती दुबईची रहिवासी असल्यांच तिने सांगितलं.
महिला घर सोडायला तयार नव्हती
आदित्य रॉय कपूर जेव्हा घरी परतला तेव्हा संगीताने त्याला संपूर्ण घटनेची माहिती दिली. अभिनेत्याने या महिलेला ओळखण्यास नकार दिला आणि तिला घराबाहेर पडण्यास सांगितले. पण ती महिला तिथून निघायला तयारच नव्हती. ती घरातून जाण्यास तयारच नव्हती. त्यानंतर आदित्यने सोसायटीच्या मॅनेजर जयश्री डुंकडू यांना कळवले, ज्यांनी अभिनेत्याची मॅनेजर श्रुती राव यांना कळवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांत याबाबत तक्रार करण्यात आली.
महिला पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर त्या महिलेचा अभिनेत्याच्या घरी येण्याचा उद्देश काय होता असे विचारले असता, महिलेने कोणतेही उत्तर दिले नाही. महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत
आदित्य रॉय कपूरच्या आधीही अज्ञात व्यक्तींनी चित्रपट कलाकारांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांच्यासोबत गुन्हेगारी कृत्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच, अभिनेता सलमान खान व्यतिरिक्त, काही महिन्यांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवरही हल्ला झाला होता. ज्यामध्ये तो जखमी झाला होता.त्यामुळे आता कलाकारांच्या घरी असं थेट अनोळखी व्यक्तींनी येऊन धडकने फारच धक्कादायक आहे.