Usha Nadkarni : तो हिंसक माणूस, आम्हाला खूप…उषा नाडकर्णी यांनी सांगितलेली वडिलांची कटू आठवण
Usha Nadkarni : उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या भूतकाळात खूप त्रास सहन केला आहे. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं असून त्यांना प्रेक्षकांचंही भरघोस प्रेम मिळालं. उषा यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत नाव कमावलं. पण, त्यांचं बालपण खूप खडतर गेलं. याबद्दल उषा यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं. उषा यांचे वडील खूप कडक शिस्तीचे होते. याबद्दलही उषा यांनी भाष्य केलेलं.
हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांच्या पॉडकास्टवर बोलताना उषा नाडकर्णी वडिलांबद्दल म्हणालेेल्या की, ‘तो खूप हिंसक माणूस होता, आम्हाला त्याची खूप भीती वाटायची. आमच्यापैकी एकाला मारहाण व्हायची आणि बाकीचे दोघे पळून जायचे. एकदा, माझ्या भावाला काही कारणास्तव मार पडला होता. आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर कोयत्यानं हल्ला केला. खूप धार असलेला चाकू! माझ्या हाताला त्यामुळे दुखापत झाली आणि दुसऱ्या दिवशी माझा नाटकाचा कार्यक्रम होता. मी त्या दुखापतीसह प्रयोगाला गेले होते.’
तसेच पिंकवव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत उषा म्हणालेल्या की, ‘खूप वाईटरित्या मारल्यानंतर, ते आमच्यासाठी खास आईस्क्रीम आणायचे. जर त्यांना वर्तमानपत्र दुमडलेलं किंवा चुरगळलेलं दिसलं तरी ते रागावायचे आणि ते फाडायचे. जर त्यांना दिसलं की, आमची शाळेची पुस्तकं व्यवस्थित ठेवली गेली नाहीत, तर ते रागाने ती फाडायचे.’
आईवडील अभिनयाच्या विरोधात
उषा नाडकर्णी यांनी सांगितलेलं की, त्यांचे आई–वडील अभिनयक्षेत्राच्या विरोधात होते. ज्यावेळी उषा यांनी अभिनयात करिअर करण्याचं त्यांच्या आईला सांगितलं, तेव्हा ती खूप रागावलेली. ‘मी तिला सांगितलं तेव्हा तिनं माझे सर्व कपडे रस्त्यावर फेकून दिले आणि मला घराबाहेर काढलं.’ असं उषा यांनी सांगितलेलं. आईनं घराबाहेर काढल्यानंतर उषा एक आठवडाभर मैत्रिणीकडे राहिलेल्या.
