‘उत्तर रामायण’मधील कुश आठवतोय? तो आज 1400 कोटींच्या कंपनीचा मालक

रामानंद सागर यांच्या 'उत्तर रामायण' या लोकप्रिय मालिकेत लव आणि कुश यांची कथा दाखवण्यात आली होती. यामध्ये लवची भूमिका अभिनेता स्वप्निल जोशीने साकारली होती, तर कुशच्या भूमिकेत मयुरेश क्षेत्रमाडे होता. आज तोच मयुरेश तब्बल 1400 कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

उत्तर रामायणमधील कुश आठवतोय? तो आज 1400 कोटींच्या कंपनीचा मालक
उत्तर रामायण मालिकेत कुशची भूमिका साकारलेला मयुरेश क्षेत्रमाडे
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 10:52 AM

1980 च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चाच बोलबाला होता. या पौराणिक मालिकेला संपूर्ण देशभरातून लोकप्रियता मिळाली. हीच गोष्ट लक्षात ठेवून निर्मात्यांनी काही वर्षांनंतर उत्तर रामायण प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. यामध्ये प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्या लव आणि कुश या दोन पुत्रांची कथा दाखवण्यात आली होती. 1988 मध्ये प्रसारित झालेल्या ‘उत्तर रामायण’ मालिकेत लवची भूमिका अभिनेता स्वप्निल जोशीने तर कुशची भूमिका मयुरेश क्षेत्रमाडेनं साकारली होती. स्वप्निल जोशी तर मराठी कलाविश्वातील सर्वांत लोकप्रिय अभिनेता बनला. परंतु मयुरेश सध्या काय करतोय, हे तुम्हाला माहीत आहे का? मयुरेश आज तब्बल 1400 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.

‘उत्तर रामायण’मधून लोकप्रियता मिळवल्यानंतर मयुरेशने वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला रामराम केला आणि पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, त्यानंतर मयुरेश उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आणि तिथे त्याने फायनान्स, बिझनेसचं शिक्षण घेतलं. मयुरेशच्या लिंक्डइन प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, त्याने 2003 पासून वर्ल्ड बँकमध्ये रिसर्चर म्हणून काम केलं. ज्यानंतर तो कॉर्पोरेट विश्वात पूर्णपणे सक्रिय झाला. मयुरेशसाठी 2016 हे वर्ष खूप खास होतं. कारण याच वर्षांत त्याची कमिशन जंक्शन या जागतिक मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या सीईओपदी नियुक्ती झाली. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीने मयुरेशने 2022 पर्यंत या कंपनीला 1400 कोटींचा महसूल मिळवून दिला. मयुरेश आज एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारुपाला आला आहे. तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत न्यूयॉर्कमध्ये राहतो.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ आणि ‘उत्तर रामायण’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज इतक्या वर्षांनंतरही या मालिकांची लोकप्रियता कायम आहे. त्यातील कलाकारांना आजही प्रेक्षक देवाच्या रुपात पाहतात आणि तितकाच त्यांचा आदर करतात. रामायण या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती, तर अरुण गोविल हे प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत होते. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आली होती. तेव्हासुद्धा या मालिकेने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.

Follow Us