गाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?

| Updated on: May 09, 2021 | 3:05 PM

गायिका नंदा नांद्रेकर या गायिका म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. (vaman dada kardak praised nanda nandrekar's songs)

गाजलेल्या नाजुका मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?
nanda nandrekar
Follow us on

मुंबई: गायिका नंदा नांद्रेकर या गायिका म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. कॅसेट, कार्यक्रम आणि रियाज हीच त्यांची दुनिया आहे. पण गायिका म्हणून यश मिळालं असलं तरी दोन गोष्टींची मात्रं त्यांना कायम सल आहे. एक म्हणजे अलका याज्ञिक यांच्याबरोबर गाणं गाण्याची चालून आलेली संधी गमावली त्याची. आणि दुसरी म्हणजे ‘नाजुका’ या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची ऑफर आलेली असतानाही ती नाकारल्याची. (vaman dada kardak praised nanda nandrekar’s songs)

दोन संधी गेल्या

नंदा नांद्रेकर यांना प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्याबरोबर एका धार्मिक कॅसेटमध्ये गाणं गाण्याची संधी चालून आली होती. परंतु, काही कारणास्तव त्यांना या कॅसेटमध्ये गाता आलं नाही. त्याचं दु:ख त्यांना आजही वाटतं. दुसरी संधीही अशीच गमावली. त्यांना एकेकाळी गाजलेल्या ‘नाजुका’ या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी आली होती. परंतु, अभिनय करू शकणार नाही, या भीतीपोटी त्यांनी संधी नाकारली. आज या सर्व गोष्टींचा त्यांना पश्चात्ताप होत आहे. या चालून आलेल्या संधी स्वीकारल्या असत्या तर आज आपलं जगणं वेगळंच असतं, असं त्या म्हणतात.

पाणी विचारले नाही, नंतर अर्जवे सुरू

जळगाव जिल्ह्यातील भादली येथील त्यांचा असाच एक किस्सा प्रसिद्ध आहे. भादलीत त्यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला रात्री 10 वाजता पोहोचायचं होतं. पण त्या जळगावला वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. जळगावला उतरण्याऐवजी त्या भुसावळल्या उतरल्या. त्यामुळे त्यांना रिक्षाने प्रवास करत जळगावला जावं लागलं. कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे ग्रामस्थ आणि आयोजक चांगलेच चिडले होते. त्यात गायक दत्ता शिंदे कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यामुळे आयोजकांचा संताप अधिकच वाढला.

या संतप्त गावकऱ्यानी नंदाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाणीही विचारले नाही. जेवण तयार असूनही जेवण दिलं नाही. एका बाईने तर खास अहिराणी ठसक्यात, गाणं म्हणाले वूनात, भाकरी खावाले वूनात. यासले चटणी खावाले द्या, असं म्हटलं. तेव्हा नंदाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न जेवताच रागारागाने कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रम सुरू झाला. नंदाताईंचा आवाज आणि गाणं ऐकून ग्रामस्थांचा राग क्षणार्धात थंड झाला. प्रत्येक गाण्यावर त्यांनी नंदाताईंना प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम संपल्यावर गावकरी पुन्हा त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांना जेवण करण्याची विनंती करू लागले. काही गावकऱ्यांनी तर त्यांची अक्षरश: पाया पडून माफी मागितली.

दोन वादाकांना घेऊन कार्यक्रम

एकदा त्यांचा सोलापूरला कार्यक्रम होता. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांचा कार्यक्रम होता. प्रल्हाददादांच्या बरोबरच्या वादक मंडळींनी रेल्वेत धिंगाणा घातला होता. त्यामुळे त्यांना कर्जतलाच उतरवून देण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी प्रल्हाद दादा फक्त तबला वादक आणि हार्मोनियम वाजविणाऱ्याला सोबत घेऊन सोलापुरात उतरले. सोलापूरचे उद्योगपती गंगाराम इंगळे यांच्या घरी लग्नानिमित्त कार्यक्रम होता. नंदाताईंकडेही वादक मंडळी नव्हती. अशा वेळी केवळ दोन वादकांच्या सहाय्याने नंदाताई आणि प्रल्हाद दादांनी कार्यक्रम गाजवला. उलट या कार्यक्रमात त्यांना दहा हजार रुपयांची मिळकतही झाली.

नंदा, तुझा आवाज चांगला आहे

प्रसिद्ध कवी, गायक वामनदादा कर्डक यांनीही त्यांचं कौतुक केलेलं आहे. वामनदादा हे उल्हासनगरात पांडुरंग सोनावणे यांच्या घरी नेहमी यायचे. वामनदादा आल्याचं समजताच नंदाताई त्यांना भेटायला जायच्या. यावेळी गप्पा गोष्टी रंगायच्या. नव्या गाण्यांची चर्चा व्हायची. वामनदादा त्यांना आपली गाणी गाण्यासाठी द्यायचे. ‘नंदा, तुझा आवाज चांगला आहे. माझ्या हाताखाली मी तुला चांगलं तयार करेल. तुझ्या गायकीतल्या उणीवा काढून टाकेल. तू फक्त गात राहा,’ असं कौतुक वामनदादा त्यांचं करायचे.

नंदाताईंची लोकप्रिय गाणी

रमा साहेबाला भेटाला गेली,
नेसून जरीचा पटका,
गरीबीवर मातही केली,
नेसून जरीचा पटका…

आणि

साऱ्या जगाला वाचविण्याला
शेवटी एक उपाय,
बुद्धाविना पर्याय नाही,
बुद्धाविना पर्याय…

आणि

हळू याना गं लाटांनो,
कुणाला त्रास होईल ना,
इथ निजलाय भीम माझा,
तयाला जाग येईल ना…

आणि

आरशात रोज माझे, हे मुख पाहते मी,
भीमाने घडविलेले, हे रुप पाहते मी… (साभार, आंबेडकरी कलावंत) (vaman dada kardak praised nanda nandrekar’s songs)

संबंधित बातम्या:

शाळेत असतानाच आडनाव टाकलं, चार हजारांवर गाणी गायली; ‘या’ गायिकेबद्दल माहीत आहे का?

‘पुण्याचा राघू’ने ओळख मिळाली, आनंद-मिलिंद शिंदेंचा प्रभाव; वाचा, गायक राहुल शिंदे यांचे किस्से

पुण्यातील भिंती रंगवल्या, आंदोलने, राडेही केले, आज गायक म्हणून लोकप्रिय!; वाचा, राहुल शिंदेंचे किस्से

(vaman dada kardak praised nanda nandrekar’s songs)