
मुंबईतील एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतर अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांच्या नात्यात मोठी फूट पडली. डेटिंगच्या अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी ब्रेकअप केल्याच्या चर्चांना उधाण आलं. यासाठी कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर तारा आणि एपी ढिल्लों यांच्यातील रोमान्स कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी ब्रेकअपच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता वीर पहारियाच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तारासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो पोस्ट करत क्रिप्टिक कॅप्शन लिहिली आहे. त्याच्या कॅप्शनची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतरच तारा आणि वीर यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पहायला मिळालं. स्टेजवर एपी ढिल्लों आणि तारा सुतारिया एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. परंतु हे सर्व मला आणि माझ्या नात्याला उद्ध्वस्त करण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप नंतर ताराने केला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्यात आल्याचंही तिने म्हटलं होतं. त्याच्या काही दिवसांनीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.
आता वीरने त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘काळ चांगला असो किंवा वाईट.. तो दिवस बदलतोच.’ हा कॅप्शन वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘आम्हाला तुला तारासोबत पहायचं आहे, कृपया पॅचअप करा’, असं एकाने म्हटलं. तर ‘कधीही तुमच्या खऱ्या भावना जगासमोर उघड करू नका, नजर लागते’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचं पाहून अखेर वीरने थोड्या वेळानंतर त्याचं कॅप्शन बदललं आणि तिथे फक्त एक इमोजी पोस्ट केला.
‘फिल्मफेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार, तारा आणि वीरने सहमताने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. परंतु एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याने, नेटकऱ्यांनी त्याच्याशी संबंध जोडला आहे. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.