Katrina Vicky | कतरिनाला घटस्फोट देणार विकी कौशल? पत्रकाराच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलेलं उत्तर चर्चेत

अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री सारा अली खानसोबत तो एका कार्यक्रमात पोहोचला असता तिथे पत्रकाराने विकीला कतरिनासोबतच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला.

Katrina Vicky | कतरिनाला घटस्फोट देणार विकी कौशल? पत्रकाराच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलेलं उत्तर चर्चेत
Vicky Kaushal and Katrina Kaif
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:04 PM

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि सारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. प्रेक्षकांना एक नवी जोडी मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईतील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. यावेळी सारा अली खान आणि विकी कौशल दोघंही उपस्थित होते. ट्रेलर लाँच झाल्यानंतर दोघांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. यावेळी विकी कौशलला त्याची पत्नी कतरिना कैफसोबत घटस्फोटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विकीने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा आणि विकी हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. मात्र लग्नानंतर काही काळाने या दोघांच्या नात्यात कटुता येते. अखेर हे दोघं एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतात. ट्रेलरमधील याच गोष्टीवरून एका पत्रकाराने विकीला त्याच्या घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला. “जर तुला कतरिना कैफपेक्षा चांगली दुसरी कोणती अभिनेत्री भेटली तर तू तिला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करशील का”, असा प्रश्न विकीला विचारण्यात आला. या प्रश्नावर विकीची मजेशीर प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.

पत्रकाराचा प्रश्न ऐकून आधी विकीला खूप हसू आलं. त्यानंतर तो म्हणाला, “सर.. मी आता बच्चा आहे. आधी मला नीट मोठं तरी होऊ द्या. तुम्ही असे प्रश्न विचारत आहात, मी तर अजून लहान आहे. संध्याकाळी मला घरीसुद्धा जायचं आहे. अशा विचित्र प्रश्नांचं उत्तर मी कसं देऊ?” त्यानंतर तो प्रश्नाचं उत्तरसुद्धा देतो आणि म्हणतो, “जन्मा-जन्मांपर्यंत.” म्हणजेच विकी अनेक जन्मांपर्यंत कतरिनाची साथ देणार आहे. त्याच्या उत्तराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट येत्या 2 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये कॉमेडीसुद्धा पहायला मिळतेय. सारा आणि विकी यांच्यातील केमिस्ट्री नेटकऱ्यांना खूप आवडली आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती. आता सोशल मीडियावर विकी-कतरिना एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.