Vidyadhar Joshi : राजकारण्यांकडून स्पॉन्सरशिप मिळायला लागली, तेव्हापासून गणेशोत्सवाची माती…विद्याधर जोशींचं वक्तव्य

Vidyadhar Joshi : मराठी अभिनेते विद्याधर जोशी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता एका मुलाखतीत विद्याधर यांनी बदलत्या गणेशोत्सवाबद्दल भाष्य केलं आहे.

Vidyadhar Joshi : राजकारण्यांकडून स्पॉन्सरशिप मिळायला लागली, तेव्हापासून गणेशोत्सवाची माती...विद्याधर जोशींचं वक्तव्य
| Updated on: Oct 06, 2026 | 2:31 PM

मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. विद्याधर जोशी स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी ‘कलावंत‘ या ढोल ताशा पथकाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विद्याधर जोशी चर्चेत आले होते. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत विद्याधर यांनी गणेशोत्सवाबद्दल भाष्य केलं आहे. ‘जेव्हापासून स्पॉन्सरशिप सुरू झाली तेव्हापासून गणेशोत्सवाची माती झाली‘ असं विद्याधर जोशी म्हणाले.

विद्याधर जोशी यांचं वक्तव्य चर्चेत

Loading...

विद्याधर जोशी म्हणाले की, ‘आम्ही दोन रुपये, पाच रुपये, अकरा रुपये, पंचवीस रुपयापासून घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचो. आणि गणपती संपला की जिथून आम्ही वर्गणी घेतली, तिथे सगळीकडे जाऊन आम्ही छापील हिशोब द्यायचो. मात्र, जेव्हापासून स्पॉन्सर्स सुरू झाले, तेव्हापासून सगळा प्रॉब्लेम सुरू झाला, असं मला वाटतं.’

‘कारण, गणपती चाळीत होता की मैदानावरती होता, यापेक्षा स्पॉन्सरशिप मिळायला लागली विविध कंपन्यांपकडून किंवा सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे राजकारण्यांकडून स्पॉन्सरशिप मिळायला लागली, तेव्हापासून या गणेशोत्सवाची माती झाली.’ असं विद्याधर शेवटी म्हणाले. ‘आरपार‘ला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी बोलत होते.

दरम्यान, अनेक कलाकारांनी बदलत्या गणेशोत्सवाबद्दल भाष्य केलेलं. अभिनेत्री श्रुती मराठे ‘अमुक तमुक‘ला दिलेल्या मुलाखतीत गणेशोत्सवाबद्दल म्हणालेली की, ‘जी मजा १५ वर्षांपूर्वी गणपतीमध्ये होती, ती कदाचित नाहीये. आधी सुटसुटीतपणा होता. त्याला एक कमर्शियल ॲंगल नव्हता. आता मला असं वाटतं की, या सगळ्यांना एक खूप कमर्शियल ॲंगल आलाय. आज जर एका मंडळाने गणपतीची स्थापना केली तर ६०० मीटरवर दुसरं एक मंडळ असतं जे गणपतीची स्थापना करतं. त्यामुळे त्याला कमर्शियल ॲंगल आला.’

‘सोशल मीडिया यासाठी कारणीभूत आहे. कारण, आपण ते ग्लोरीफाय केलंय. आता पुण्यात गणपती कसा असतो, मुंबईत कसा असतो, ते बघण्यासाठी खूप लोकं येतात. ढोल ताशा पथकाची प्रॅक्टिस असते त्याचे व्हिडिओज व्हायरल होतात, त्यामुळे त्यांना बघायला लोकं येतात. पण खरंच जी मजा १५ वर्षांपूर्वी गणपतीमध्ये होती ती कदाचित नाहीये.’ असंही अभिनेत्री म्हणालेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us