
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांनी लग्नाबाबत अधिकृत माहिती दिली नसली तरी काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडल्याचं कळतंय. या साखरपुड्यानंतर रश्मिकाच्या बोटात अंगठीही पहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उदयपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं समजतंय. जसजशी त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे, तसतसे विजय आणि रश्मिका हळूहळू जाहीरपणे प्रेम व्यक्त करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने विजयशी लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता एका कार्यक्रमात विजयने रश्मिकाला सर्वांसमोर किस केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या यशानिमित्त हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विजय देवरकोंडासुद्धा उपस्थित होता. रश्मिका आणि विजय कार्यक्रमातील पाहुण्यांसोबत बोलत असतात. त्यानंतर विजय आधी रश्मिकाशी हातमिळवणी करतो आणि त्यानंतर तिच्या हातावर किस करतो. यावेळी रश्मिकासुद्धा लाजत हसते. विजयने पहिल्यांदाच अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात रश्मिकाविषयी जाहीर प्रेम व्यक्त केलंय. त्यामुळे या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.
रश्मिका आणि विजयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘हे दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘अखेर दोघं एकमेकांसाठीचं प्रेम मोकळेपणे व्यक्त करू लागले, जोडी खूपच छान आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत आहेत. परंतु याविषयी कधीच त्यांनी जाहीर कबुली दिली नव्हती. या दोघांनी ‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. तेव्हापासूनच त्यांची जोडी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर दोघांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. रश्मिकाने ‘गुडबाय’, ‘छावा’, ‘ॲनिमल’ आणि ‘थामा’ या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर विजयने ‘लायगर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.