विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट, टीझर पाहून पाणावले चाहत्यांचे डोळे
विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बेवारस' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये विक्रम गोखलेंना पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांच्या अखेरच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची कथा अतिशय हृदयस्पर्शी असल्याचं पहायला मिळतंय. या चित्रपटातील उत्तम स्टारकास्टची झलक टीझरमध्ये दिसत आहे. येत्या 25 जून रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका या चित्रपटात विक्रम गोखले यांनी साकारली आहे. पायाने अधू असलेल्या एका अनाथ मुलाचा कोर्टकचेरी संघर्ष याची कहाणी ‘बेवारस’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. यात विक्रम गोखले यांच्या आर्त, भावनिक अभिनयाची झलक टीझरमध्ये दिसते. हृदयस्पर्शी कथानक, उत्तम स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना दमदार अभिनयाची पर्वणी मिळणार असल्याचा विश्वास टीझरमुळे निर्माण झाला आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पहा टीझर-
हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. या चित्रपटाची निर्मिती रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांची आहे. तर कथा विजय राणे आणि दिग्दर्शन विजय राणे आणि रिया कुमार यांचं आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे, शिरीष लाटकर यांची पटकथा, संवाद लेखन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, शिर्षक गीत लेखन रिया कुमार आणि संगीत बिपलाब दत्ता यांचं आहे.
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्व माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचं नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झालं. वयाच्या 77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ते गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा विक्रम गोखले यांनी पुढे नेला होता.