
बॉलिवूड गाण्यांची क्रेझ ही जगभरात असल्याचे पाहायला मिळते. अनेकांना या गाण्याचा अर्थ माहित नसला तरीही त्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतात. नुकताच गायिका शिबानी कश्यपने वर्ल्ड एंड अस- इंडियन फेस्टिवल, न्यूझीलंड चॅप्टर 2025 मध्ये परफॉर्म केले. तिच्या संगीत आणि गाण्यांनी प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. शिबानी यांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली की न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लुक्सन यांनाही स्टेजवर येण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. ते देखील शिबानीच्या गाण्यांवर थिरकताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
न्यूझीलंडचे पंतप्रधान शिबानीच्या गाण्यावर नाचले
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लुक्सन शिबानीचे गाणे लक्षपूर्वक ऐकताना दिसतात. त्यानंतर ते हळूहळू नाचायला सुरुवात करतात. पुढे शिबानी त्यांचा हात धरते आणि त्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहित करते. न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते एकत्रितपणे शिबानीच्या गाण्यांवर नाचताना दिसतात.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर शिबानीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. काहींनी शिबानीचे कौतुक केले आहे तर काहींनी क्रिस्टोफर लुक्सन यांच्या बॉलिवूड गाण्यांची आवड अधोरेखीत केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.
कोण आहे शिबानी कश्यप?
शिबानी कश्यप एक प्रसिद्ध भारतीय गायिका आणि संगीतकार आहे. तिने 1990 च्या दशकात इंडीपॉप आणि बॉलिवूड संगीतात उल्लेखनिय काम केले. तिची लोकप्रिय गाणी जसे की “सजना आ भी जा” आणि “नच बलिए” यांनी तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. न्यूझीलंडमधील या सांस्कृतिक उत्सवात तिने भारतीय संगीत आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले, ज्यामुळे प्रेक्षकांवर तिचा मोठा प्रभाव पडला. वर्ल्ड एंड अस- इंडियन फेस्टिवल हा एक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उत्सव आहे, जो भारतीय कला, संगीत आणि संस्कृतीला जगभरात प्रोत्साहन देतो. न्यूझीलंड चॅप्टर 2025 मध्ये शिबानीच्या परफॉर्मन्सने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले, विशेषतः पंतप्रधान क्रिस्टोफर लुक्सन यांना, जे त्यांच्या संगीतावर थिरकले.