प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक अंगठी’; कॅमेरापासून लपवण्याचा केला प्रयत्न

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोमवारी 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी मथुरेला पोहोचला.

प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या विराट-अनुष्काच्या हातात दिसली इलेक्ट्रॉनिक अंगठी; कॅमेरापासून लपवण्याचा केला प्रयत्न
Virat Kohli and Anushka Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2025 | 3:34 PM

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली त्याच्या पत्नीसोबत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचला. सोमवारी विराटने निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर लगेच त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात सतत जात असतात. आता आयुष्यातील इतक्या मोठ्या निर्णयानंतर दोघं पुन्हा एकदा त्यांच्या दरबारी पोहोचले आहेत. यावेळी दोघांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओ आणि फोटोमधील विराट – अनुष्काच्या हातातील एका इलेक्ट्रॉनिक अंगठीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.

विराट आणि अनुष्का यांनी देवाचं नाव जपण्यासाठी बोटात डिजिटल टॅली इलेक्ट्रॉनिक फिंगर क्लिकर रिंग घातली होती. विराटने जेव्हा प्रेमानंद महाराजांसमोर हात जोडले, तेव्हा त्यांच्या बोटात ही इलेक्ट्रॉनिंग अंगठी दिसून आली. परंतु यावेळी अनुष्काने तिच्या बोटातील अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये विराटच्या हातात गुलाबी रंगाची ही अंगठी सहज पहायला मिळतेय. देवाचं नाव किती वेळा जपलं गेलं, यासाठी ही डिजिटल टॅली काऊंटर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक टॅली काऊंटर रिंग वापरली जाते. जपमाळेऐवजी अनेकजण आजकाल या रिंगचा वापर करतात.

प्रेमानंद महाराजांनी यावेळी अनुष्काला विचारलं, “खुश आहेस?” तेव्हा अनुष्काच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तर विराट म्हणाला, “होय, आता ठीक आहे.” त्यानंतर महाराज त्याला म्हणतात, “तू स्वस्थ राहायला हवं.” हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रेमानंद महाराज विराट-अनुष्काला म्हणाले, “हे वैभव मिळणं कृपा नाही, हे पुण्य आहे. आपल्या आतील चिंतन बदलणं ही देवाची कृपा मानली जाते. तुम्ही जसे आहात तसेच राहा, सांसारिक बनून राहा. परंतु आतील चिंतन बदललं पाहिजे. त्यात यशाची भावना राहू नये. प्रभू अनेक जन्म व्यतीत झाले, आता मला तुम्ही हवे आहात, असा मनात विचार हवा.” यावेळी अनुष्का त्यांना विचारते की, “देवाच्या नामजपाने हे शक्य आहे का?” त्यावर महाराज होकारार्थी उत्तर देतात.